घोटी येथील कारखान्यात ४० लाखांची वीजचोरी : महावितरणकडून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

महावितरणच्या नाशिक मंडळ अंतर्गत असलेल्या घोटी येथील साईमेवा फूडस अँड बेवरजेस या बाटली बंद पिण्याचे पाणी निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाने तपासणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून एकूण २ लाख २१ हजार ८५६ विद्युत युनिटस म्हणजे एकूण ४० लाख ३७ हजार ४७० रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले. महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलीस स्टेशनला भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलमानुसार कारखान्याचे मालक डॉ. प्रदीप मेवालाल जयस्वाल व  मेघराज यशवंत भगत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, घोटी येथे साईमेवा फूडस अँड बेवरजेस या कारखान्याच्या नावाने थ्री फेज वीजजोडणी दिलेली असून सदर कारखान्याचे मालक डॉ. प्रदीप मेवालाल जयस्वाल असून मेघराज यशवंत भगत हे सध्या कारखान्याचे कामकाज बघत आहे. सदर ठिकाणी तपासणीसाठी  सहाय्यक अभियंता ए. जी. चव्हाण तपासणीसाठी गेले असता त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना  कारखान्याचे वीजमीटर दाखविण्याची विनंती केली असता, सदर कर्मचाऱ्यांनी वीजमीटर बाबत निश्चित माहिती नाही मालकांना विचारून सांगतो असे सांगितले. त्यामुळे सदर ठिकाणी  गैरप्रकार असल्याचा  संशय आल्यावर सहाय्यक अभियंता चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील वायरींगच्या आधारे वीज मीटर शोधून काढले. सदर कारखान्यात प्लास्टिक बाटली तयार करण्याचे यंत्र, बाटलीत पाणी भरण्याचे यंत्र, बाटलीला लेबल लावण्याचे यंत्र, बाटली पॅकिंग यंत्र, पाणी शुद्ध करण्याचे यंत्र, कॉम्प्रेसर अशी निरनिराळी यंत्रे व विद्युत दिवे इत्यादी विजेच्या उपकरणांचा जोडभार १४२.३८ किलोवॅट  इतका आढळला. सदर कारखान्यातील विजेची उपकरणे तेथील कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सुरु करून तपासणी केली असता वीज मीटर रीडिंग दर्शविणारी मीटरची स्क्रीन बंद होती तसेच मीटरचे टर्मिनलचे कव्हर काढून बाजूला ठेवले होते. टर्मिनल मधील RYB या तीनही फेजच्या होल्टेजचे स्क्रू ढिले केलेले होते. त्यामुळे मीटर मधून वीजपुरवठा करणाऱ्या केबलशी सदर स्क्रूचा संपर्क तुटून वीज मीटर बंद होते व वापरलेल्या विजेची नोंद मीटर मध्ये होत नाही असे लक्षात आले. अशा प्रकारे वीज मीटरच्या मूळ जोडणीत छेडछाड व फेरबदल करून मागील १४ महिन्याच्या कालावधीत या कारखान्यात विजेची चोरी केल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस झाले. एकूण २ लाख २१ हजार ८५६ विद्युत युनिटची म्हणजे एकूण ४० लाख ३७ हजार ४७० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी मंगळवारी ८ मार्चला घोटी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सदर कारखान्याचे मालक डॉ. प्रदीप मेवालाल जयस्वाल व मेघराज यशवंत भगत यांचे विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, सहाय्यक अभियंता ए.जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता डी.जी. पंडोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यु. इ. बागडे यांनी ही कारवाई केली. वीज चोरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली असून बेकायदेशीरपणे वीज वापर करणारे महावितरणच्या रडारवर आहेत. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या  कलम १३५ नुसार वीजचोरी करणाऱ्याला कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!