अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न दिल्यास मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन : लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे न भूतो न भविष्यती नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इगतपुरी तालुक्याचे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे लोकप्रतिनिधी कार्यक्रमांमध्ये मश्गुल आहेत. आधीच विविध प्रकल्पांमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांना अस्मानी सुलतानी संकट सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी, विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला अंकुश लावावा अशी मागणी कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार न केल्यास संतापाचा उद्रेक होऊन असंख्य शेतकऱ्यांसह मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाऊसाहेब धोंगडे यांनी दिला आहे.

इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात अतिपावसाने शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले आहे. त्यामुळे खासगी आणि बँकांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी भात आणि बागायती पिके जगवली. ऐन मोसमात जगवलेल्या पिकांमुळे उत्पन्न मिळणार असल्याची आशा असतांना अवकाळी पावसाने धूळधाण केली. यामुळे सर्व शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. इगतपुरी तालुक्याच्या प्रत्येक गावातील सर्वच शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला दिसतो. अशा संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा न देता महसूल प्रशासन कागदी घोडे नाचवण्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून निवडून येणारे तथाकथित नेते कार्यक्रमांमध्ये मश्गुल झाले आहेत. विमा कंपन्यांवर सुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. ह्या पार्श्वभूमीवर कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी, विमा कंपन्यांना धडा शिकवून त्यांच्याकडून नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी. अन्यथा मुंबई आग्रा महामार्गावर असंख्य शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भाऊसाहेब धोंगडे यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता झालेल्या अवकाळीमुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास शेतकऱ्यांसह मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
- भाऊसाहेब धोंगडे, लोकनियुक्त सरपंच कुऱ्हेगाव

Leave a Reply

error: Content is protected !!