इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
शासनाच्या सेवेत राहून ग्रामीण आदिवासी भागातल्या नागरिकांच्या प्रश्नांना वाहून घेणारे अधिकारी दुर्मिळ आहेत. प्रत्येक नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण करतांना त्यांच्या जीवनात “प्रकाश” आणणारे ग्रामसेवक प्रकाश कवठेकर यांची कारकीर्द कुणीही विसरणार नाही. त्यांच्यामुळे शासनाच्या ध्येय धोरणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याने प्रकाश कवठेकर आमच्यासाठी नेहमीच वंदनीय राहतील असे गौरवोद्गार खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण यांनी काढले. इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक प्रकाश कवठेकर यांची नांदेड जिल्ह्यात जिल्हा बदली झाली. यानिमित्ताने ग्रामपंचायत खैरगाव, प्राथमिक शाळा खैरगाव यांनी त्यांच्या गौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी ॲड. आघाण बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, प्रकाश कवठेकर हे संवेदनशील आणि कवी मनाचे अधिकारी आहेत. शासनाची आणि जनतेची प्रामाणिक सेवा करतांना राष्ट्रीय दर्जाची चित्रकला करतात. त्यांच्या नोकरीचा प्रारंभ खैरगाव ग्रामपंचायतीत झाला. यानंतर इगतपुरी तालुक्यात त्यांनी अनेक गावांत सेवा केली. खैरगाव गावाला विकसित करण्यात प्रकाश कवठेकर यांचे मोठे योगदान आहे. यासह खैरगाव जिल्हा परिषद शाळेला आयएसओ मानांकन मिळवून देणाऱ्या दुर्लभ अधिकाऱ्याची बदली झाल्याने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरव समारंभ झाला असे ते शेवटी म्हणाले. यावेळी खैरगाव भागातील ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू दाटून आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक निंबा मोरे यांचाही स्वागत समारंभ झाला. खैरगावचे लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण, उपसरपंच गणेश गायकर, ग्रामसेविका सुवर्णा आहेर, यशवंत साबळे, विलास गवळे, कैलास शिंदे, पार्वता गिळंदे,मनोज वाघ, नंदिनी कुलकर्णी, ज्योती टोचे, शैलेंद्र भामरे, जितू परदेशी, आनंदा मुठे, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.