राज्यातील १०५ नगरपंचायतींची निवडणूक घोषित : आरक्षित जागेवर अर्ज भरतांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

राज्यातील १०५ नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १ ते ७ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २१ डिसेंबरला मतदान तर निकाल २२ डिसेंबरला जाहीर होणार आहे. ह्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग वाढणार आहे.

निवडणुकीत नामनिर्देशनपत्रासोबत जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रात नमूद आहे. परिणामी अल्पकाळात जातपडताळणी करून घेण्याचे आव्हान सर्वांसमोर असणार आहे. जातपडताळणीच्या पावतीवर निवडणूक लढवता यावी यासाठी निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या शैक्षणिक कामांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी समित्यांवर मोठा बोजा आहे. ह्यातच निवडणुकीचे काम आल्यास समित्यांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. गेल्या आठवड्यात बार्टीची वेबसाईट जाम झाल्याने आधीच कामकाज थंडावले आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यातील नवनिर्मित, मुदत संपलेल्या आणि मुदत संपणाऱ्या १०५ नगरपंचायतींची निवडणूक आज घोषित झाली. मतदार याद्या प्रसिद्धी २९ नोव्हेंबरला होईल.३० नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात येईल. ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी  १ ते ७ डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ह्या कालावधीत दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबरला सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी 13 डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी होणार आहे. ह्या नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला सकाळी ७. ३० ते ५. ३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी 22 डिसेंबरला करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अत्यंत चुरस आणि तीव्र स्वरूपाच्या स्पर्धा ह्या निवडणुकीत दिसून येतील. यासाठी विविध गटांच्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून उमेदवारांची विक्रमी संख्या निवडणुकीत दिसून येईल. इच्छुकांची धावपळ उडाली असून आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!