वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. ह्यामध्ये चालक जागीच ठार झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर ट्रक क्रमांक MH -15 – JG -0297 मुंबईहुन नाशिककडे येत असतांना जुन्या कसारा घाटात पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फुटावर जाऊन आदळला. या अपघातात ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे ( वय २३ वर्ष ) रा. नाशिक हा ठार झाला. गाडीचा क्लिनर तुषार शिंदे ( वय २७ ) हा गंभीर जखमी झाला असुन त्याला टोलच्या रुग्णवाहिकेनेे इगतपुरी ग्रामीण रुग्णiलयामध्ये दाखल केले. पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लिनर दोघानाही शोधण्यात अडथळा येत होता. सदर अपघाताची माहिती मिळताच मुंबई एक्सप्रेसवेचे गस्त पथक रवि देहाडे त्यांचे सहकारी दीपक मावरिया, धीरज सोनवणे, रवि दुर्गुडे, तसेच घोटी टॅब महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. के. हिरे, एन. एस. सोनवणे, एस.पी. सावकार, एच. एम. गुजरे, पी. सी हिरे आदींनी अथक प्रयत्न करून ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लिनर तुषार शिंदे यांना ३०० फुट खोल दरीतून बाहेर काढले.
जुन्या कसारा घाटात अपघात झाल्याची माहिती समजताच आमचे पोलीस पथक व एक्सप्रेसवे पथक घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. चालकाचा मृतदेह व जखमी क्लीनरला तातडीने बाहेर काढले. वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी झोप येत असेल तर महामार्गावर वाहन चालवु नये. विशेष म्हणजे कसारा घाटात रात्रीच्या वाहन चालवतांना चालकांनी विशेष काळजी घ्यावी.
- अमोल वालझाडे, सहा. पोलीस निरीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक