लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी शांततेत नमाज पठण करून शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले. जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहून आगामी बकरी ईद व आषाढी एकादशी सण उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांनी नियोजन केले आहे. या सणाच्या निमित्ताने प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत शांतता कमिटी बैठक झाली. ग्रामीण भागातील शांतता तसेच कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उद्देशाने पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी मार्गदर्शन केले.
इदगाह परिसरात गर्दी न करता सण उत्सव साजरा करावा. जनतेने सर्व सण उत्सव साजरे करताना शासनाने दिलेल्या नियमात साजरे केले तर कोणत्याही जाती धर्माला आपली प्रगती करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. सर्वांनी पोलीस मित्र बनून सहकार्य केल्यास कोणतीही अनुचित घटना घडणार नाही असेही पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले. या प्रसंगी गोपनीय विभागाचे सोमनाथ बोराडे, अनिल काकड आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आगामी बकरी ईद आणि आषाढी एकादशी सण उत्सव साजरे करताना धार्मिक सलोखा राखण्यासाठी आणि कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहाय्य करू असे सांगितले.