इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यावर बाजार समिती आवार कमी पडू लागते. त्यामुळे मार्केटची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागत होत्या. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासक मंडळ व प्रशासनाने नियोजन करून घोटी खंबाळे शिवारात मार्केटचे स्थलांतर केले. या स्थलांतरित आवारात मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक करून शेतकरी व व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आज या स्थलांतरीत मार्केटचा शुभारंभ आमदार हिरामण खोसकर व मुख्य प्रशासक अँड संदीप गुळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या महिन्याभरापासून घोटी बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक वाढल्याने सोयी सुविधांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याबाबत दखल घेत बाजार समिती प्रशासक मंडळ व प्रशासनाने मार्केट स्थलांतर करण्याबाबत हालचाली सुरू केल्या होत्या. त्यानुसार आज घोटी खंबाळे शिवारातील आश्रमशाळेजवळील प्रांगणात स्थलांतरीत मार्केट भरविण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा पुरविण्यात येतील तसेच व्यापारी बांधवांनीही शेतमालाला रास्त भाव देण्याच्या सूचना आमदार हिरामण खोसकर, मुख्य प्रशासक संदीप गुळवे यांनी दिल्या. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, प्रशासक मंडळ सदस्य नंदलाल भागडे, तुकाराम वारघडे, नाना गोवर्धने, सुदाम भोर, खंबाळेचे उपसरपंच दिलीप चौधरी, नारायण चौधरी, सचिव जितेंद्र सांगळे, उपसचिव कातोरे आदी उपस्थित होते.
