परिशिष्ट ९ रद्द करण्यासाठी शेतकरी संघटना देणार पंतप्रधानांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

भारताच्या राज्य घटनेत पहिली घटना दुरुस्ती करून समाविष्ट केलेले परिशिष्ट ९ रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन उद्या शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भारतातील जमीनदारी नष्ट करण्याच्या निमित्ताने, १८ जून १९५१ रोजी पहिली घटना दुरुस्ती भारताच्या राज्य घटनेत परिशिष्ट ९ साविष्ट करण्यात आले. देशातील जमिनदारी संपवण्यासाठी हे परिशिष्ट तयार करण्यात आले होते. या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कायद्याच्या विरोधात किंवा कायद्या अंतर्गत केलेल्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागता येणार नाही अशी तरतूद केली. या घटना दुरुस्तीमुळे शेतकर्‍यांचा मुलभूत हक्क हिरावून घेण्यात आला. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचा अधिकार उरला नाही.
परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट असलेल्या आवशयक वस्तू कायद्यामुळे शेतीमालाच्या किमती पाडण्याचा अधिकार ही सरकारकडे आहे. इतकेच नाही तर कोणताही व्यवसाय, उद्योग  त्या मालकाकडून हिसकावून घेत राष्ट्रीयकरण करण्याची पाशवी ताकद या परिशिष्टामुळे सरकारला मिळते. सत्ताधारी पक्षांनी त्यांच्या सोयीच्या घटना दुरुस्त्या करून ते कायदे परिशिष्ट ९ मध्ये टाकून दिले आहेत. परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट असलेल्या २८४ कायद्यां पैकी ९० टक्के कायदे शेती व जमीन धारणे विषयी आहेत. एकुणच देशात शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या व उद्योजकांच्या मुलभूत हक्कांचे हनन या परिशिष्टामुळे होत आहे.

शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेने अनेक वेळा या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. रवी दवांग यांनी परिशिष्ट ९ च्या प्रतीची होळी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ घटनेची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली होती.

उद्या १८ जून २०२१ रोजी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे परिशिष्ट ९ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देणार आहे. ह्या निवेदनात अन्यायकारी परिशिष्ट ९ राज्य घटनेतून रद्द करण्याची  विनंती करण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे  निवेदन  देण्यासाठी मोठी गर्दी करू नये व कोविडच नियम पाळून आंदोलन करण्याच्या सूचना संघटनेच्या कार्यकर्त्यांना दण्यात आल्या आहेत. आंदोलन राज्यव्यापी होणार असल्याची महिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी कळवले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!