लॉकडाऊनची वर्षपूर्ती : काय शिकवले लॉकडाऊनने ?

लेखन : प्रा. देविदास गिरी

उपप्राचार्य के. पी. जी. महाविद्यालय, इगतपुरी

कोविड महामारी आल्यामुळे जगाबरोबरच भारतातही लॉकडाउन करण्यात आले. या घटनेला वर्ष पूर्ण झालं आहे. याचे अनेक चांगले तसेच वाईट अनुभव आले. माणसाचे धावणे अचानक थांबले जगणे आणि मरणे याविषयी माणूस वेगळ्या पद्धतीने विचार करू लागला. या काळात खऱ्या अर्थाने माणूस अंतर्मुख झाला. गरीब जनतेचे या काळात नको तेवढे नुकसान झाले. अनेक पातळ्यांवरील व्यवहार ठप्प झाले. देशाची प्रगती यामुळे थांबली. आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण आला. देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. माणसाच्या सर्वच जीवनावर मर्यादा आल्या. संपत्ती, मालमत्ता, श्रीमंती, मोठेपणा या गोष्टी खोट्या आहेत याची जाणीवही माणसाला झाली. या काळातील अनेक घटनांमध्ये माणुसकीचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, मदतीचे दर्शन झाले. माणसाला माणसाची किंमत कळाली, नातेसंबंधांची वीण अधिकच घट्ट झाली. माणसे एकमेकांपासून दुरावले पण यानिमित्ताने जवळही आले. हा फार मोठा फायदा म्हणावा लागेल. लॉकडाऊनने माणुसकी शिकवली, मानवधर्म शिकवला. संपत्तीपेक्षा नातेसंबंध महत्वाचे आहेत हे खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले. वर्षपूर्ती निमित्ताने माणसाने प्रेम, माया, ममता, आपुलकी, आपलेपणा, नातेसंबंध महत्वाचे आहेत. याचा अंतर्मुख होउन विचार करावा. हेच ह्यातून आपण शिकायला हवे.

प्रा. देविदास गिरी