नैसर्गिक काजवा महोत्सव, रानपक्षी, प्राणी आणि रानमेव्याचा मनसोक्त आनंद देणारे इगतपुरी तालुक्यातील मायदरा : जैवविविधता जपुन निखळ पर्यटनाचा आनंद देणारे अव्वल ठिकाण

संग्रहित छायाचित्र fecebook च्या सौजन्याने

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

इगतपुरी तालुक्याच्या हद्धीवरील सह्याद्रीचा परिसर म्हणजे निसर्गाच्या विविध आविष्कारांनी व्यापून टाकलेला नयनरम्य भाग आहे. टाकेद परिसरातील अनेक गावे, आदिवासी वाड्या पाडे ह्याचे वर्षानुवर्षे साक्षीदार आहेत. असेच जैवविविधता टिकवून ठेवणारे इगतपुरी तालुक्यातील मायदरा हे छोटेसे पण टूमदार गाव सर्वदूर प्रसिद्ध आहे. मायदरा गावाला लागून सह्याद्रीचा भाग म्हणजे नळीच्या दऱ्यातील जंगल आहे. हे जंगल म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल. जंगली वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास असलेला हा कोपरा रखरखत्या उन्हाळ्यातही सदाबहार हिरवागार असतो. काजवा महोत्सव तर ह्या भागात रोजचाच.. एवढेच नाही तर साक्षात वन्यप्राणी पाहण्याचा आनंद अवर्णनीय असतो. कधीही न पाहिलेले नानाविध पक्षी आणि प्राणी पाहातांना मोरांचा भलामोठा थवा सुद्धा पाहता येतो. अर्थातच या सर्वांगीण निसर्गसौंदर्याला भुलून पर्यटकांचा ओढा ह्या गावात वाढला आहे. तीच तीच ठिकाणे पाहून कंटाळालेल्या पर्यटकांसाठी मायदरा हे गाव निश्चितच सर्वोत्तम ठिकाण ठरले आहे. सध्याच्या काळात ह्या गावात पर्यटनाचा अनोखा आनंद घ्यायला योग्य अशी वेळ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मायदरा येथे असलेल्या विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, देशी झाडे झुडपे यांचे उत्तम संवर्धन व जतन करण्यात आलेले आहे. वनविभागाच्या व मायदरा ग्रामस्थांच्या समन्वयातून ही विविधता टिकून ठेवली गेली आहे. गावात कडक शिकार बंदी केल्यामुळे वन्य प्राणी व पक्षांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांचा मुक्त संचार नजरेस पडतो. प्रामुख्याने किंचित दृष्टीस पडणारे तरस, कोल्हे, रानमांजर याचबरोबर भटकंती करते वेळी अजस्त्र अजगर नजरेस पडल्यास नवल वाटायला नको. अशा अनेक वन्यजीवांचा वावर या ठिकाणी आढळतो. बिबटे, ससे, रान डुक्कर हे तर ग्रामस्थांना नित्यनियमाने आढळून येतात. मोर लांडोरीचा नजरेसमोर फिरणारा मुक्त थवा मन प्रसन्न करून जातो. भारद्वाज, कुकुट कुंभा, घार, हळद्या, बुलबुल, रान कोंबडी आदी विविध प्रकारचे पक्षी नजरेस सहज पडतात. करवंद, गावठी आंबे ह्या रानमेव्याचा मनसोक्त आनंद घेऊन तृप्त होण्यासाठी मायदरा हे एक आवडीचे ठिकाण झाले आहे. परिसरातील गावांसह बाहेरील येणाऱ्या पाहुण्यांना नेहमीच ह्या भागात यायची इच्छा होत असते. करवंद, आवळा, जंगली जांभूळ, मोहट्या, गावठी आंबे यावर यथेच्छ ताव मारण्यासाठी येथे नेहमीच वर्दळ असते. रानमेव्याचा संपत आलेला मोसम आता काजव्यांचा लखलखाट पाहण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी आपोआपच मायदरा नळीच्या दऱ्यात पर्यटक ओढले जातात. इतरत्र कुठेही हा आनंद घेण्यासाठी जाण्याऐवजी आपल्या जवळच्या या ठिकाणी जरूर भेट द्या. मन आनंदित व प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मायदरा येथे जाण्यासाठी नजीकचा मार्ग नाशिकहुन घोटी, टाकेद बुद्रुक, बांबळेवाडी, शिरेवाडी, मायदरा आणि नाशिकहुन भगूर, साकुर फाटा, धामणगाव, टाकेद बुद्रुक, बांबळेवाडी, शिरेवाडी, मायदरा. यासह भंडारदरा भागातून वासाळी फाट्यावरुन जाता येते. ह्या तिन्ही मार्गांनी मायदरा येथे जाता जाता येते. गुगल मॅपवरसुद्धा हे ठिकाण टाकल्यास मदत होऊ शकते. ह्यानंतर सर्वतीर्थ टाकेद, खेडचे भैरवनाथ मंदिर आणि शुक्लतीर्थ सुद्धा पाहायला संधी आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!