नागरिकांची सुरक्षा हीच पोलिसांची खरी दिवाळी
वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
यंदा दोन वर्षांनंतर ही दिवाळी सर्वांचीच गोड होणार असल्याचे चित्र बाजारात होणाऱ्या गर्दीवरून दिसून येते. सध्या दीपावलीचा सण सुरु झाला आहे. त्यानिमित्ताने बाजारात गर्दीचे प्रमाण वाढत आहे. त्याकरता विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे इगतपुरीचे पोलीस पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी सांगितले. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांसाठी विविध मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जातांना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नका, दीपावली किंवा लग्न समारंभासाठी बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे, आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना तसेच पोलिसांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी. बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालुन जाऊ नये, प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ-पिऊ नयेत, त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते, प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे. गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढतांना, उतरतांना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे, व्यापारी, दुकानदार, सराफ यांनीही या काळात मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षा ठेवावी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावेत, बाजारामध्ये खरेदी करतांना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये तसेच आपली गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क करुन हँडल लॉक करुन ठेवावी, ऑनलाईन फ्रॉडच्या आमिषाला बळी पडू नये, कोणी अनोळखी इसम पत्ता विचारण्याचा बहाणा करुन आपले जवळ येत असेल तर त्या पासुन सावध रहा, अशा व्यक्ती जवळ येऊन आपले गळ्यातील मैल्यवान सोन्याचे दागिणे हिसकाऊन नेऊ शकतात. तरी आपल्या परीसरात असे व्यक्ती फिरतांना आढळून आल्यास इगतपुरी पोलिस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहनही श्री. वसंत पथवे यांनी केले.
कोणताही सण, उत्सव असला तरी पोलीस कुटुंबापासून दूर राहून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करत असतात. सध्या प्रत्येकजण जोरदार दिवाळी सेलिब्रेशन करत असतानाच ‘जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी’ मानून पोलीस चोख कर्तव्य बजावत आहेत. जनता आनंदी असली तरच आमची दिवाळी आनंदी जाईल, अशा भावना पोलीस व्यक्त करत आहेत. पोलीस ऑनड्युटी चोवीस तास काम करतात. कामाचे तास निश्चित नसल्याने ड्युटी संपल्यानंतर अचानक अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा बंदोबस्तावर जावे लागते. सण, उत्सवात साप्ताहिक सुट्ट्याही रद्द होतात. अहोरात्र अंगावर खाकी युनिफॉर्म घालून जनतेच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणारे पोलीस घरी एखादा महत्त्वाचा कार्यक्रम असला तरी आधी कर्तव्याला प्राधान्य देतात. कुटुंबासोबत सण, उत्सव साजरी करण्याची संधी पोलिसांना क्वचितच लाभते. सध्या दिवाळीची सर्वत्र धामधूम असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळला असून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवाळीची मजा लुटत आहेत. मात्र ही दिवाळी शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस चोख कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येते.
दिवाळी आनंदाचा सण.आम्ही खरोखरच नशीबवान आहोत की दिवाळीत देशवासीयांना आनंदाबरोबर सुरक्षाही देतो. कारण आमच्या पोलिसांच्या कुटुंबाची परिभाषाच पूर्ण देश आणि देशवासीय आहे. पोलीस असल्याचा आम्हाला सार्थ गर्व आहे.
- राजाराम दिवटे, पोलीस उपनिरिक्षक इगतपुरी