इगतपुरीनामा न्यूज, दि. १
नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला महाराजा सयाजीराव गायकवाड नगरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडतर्फे नाशिकचे पालकमंत्री आणि अधिवेशनाचे आयोजक ना. छगन भुजबळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे जीवन चरित्र ग्रंथ भेट दिला. निवेदन देतेवेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्यासमवेत विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे, जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे, महानगरप्रमुख चारुशीला देशमुख, जिल्हा सचिव नीलिमा निकम, शहर संघटक प्रियंका पाटील, सुमन हिरे,।कल्पना निंबाळते, कल्याणी वाघ, नीलिमा निकम, अर्जिता पाटील, सुरेखा कोल्हे, वंदना पाटील यांच्यासह मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, प्रदीप पाटील, दर्शन पाटील, पंडित रौंदळ, पांडुरंग शिंदे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, नाशिकला ३ ते ५ डिसेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातून, राज्यातून आणि देशभरातून साहित्यप्रेमी प्रदर्शनाला संमेलन स्थळी भेट देत असतात. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक ग्रंथालय सुरू केली होती. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून “सयाजी वैभव” नावाने अनेक फिरती वाचनालये सुरू केली होती. महाराजांनी मराठी भाषेतील अनेक ग्रंथ लिहिलेले प्रकाशित केले आहेत. काही ग्रंथ त्यांनी परदेशात प्रकाशित केले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बडोदा येथे तीन साहित्य संमेलन भरवली होती. त्या साहित्य संमेलनास मोठ्या प्रमाणावर आर्थिक, मानसिक पाठबळ दिले होते. यासह महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजर होते. यावरून त्यांची साहित्याबद्दलची तळमळ लक्षात येते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कौळाणे या गावचे सुपुत्र असलेले महाराजा सयाजीराव गायकवाड हे तत्कालीन ग्रंथकार, ग्रंथ आणि ग्रंथालयांचे पोशिंदे होते. सुप्रशासन, सामाजिक सुधारणा, न्याय, शेती, उद्योग आणि त्यांचे दातृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी लिहलेल्या साहित्याची, गुणांची, प्रशासनाची ओळख व्हावी. यासाठी त्यांच्याच जन्मभूमीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाला महाराजा सयाजीराव गायकवाड नगरी असे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आमच्या मागणीचा विचार विचार करावा अशी मागणी यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी केली.