इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने व इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत महाविद्यालयात कोव्हिड -१९ लसीकरण शिबिर संपन्न झाले. मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहीम, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात हे विशेष मोफत लसीकरण मोहीम झाली. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी लसीकरणाचे महत्व आणि सामाजिक अंतर कशा प्रकारे राखून महाविद्यालयात दैनंदिन शैक्षणिक दिनक्रम आणि आरोग्य कशाप्रकारे सांभाळायचे यासंदर्भात जनजागृती आणि समाजात लसीकरण होण्याची गरज व्यक्त केली.
इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे विशिष्ट अंतर ठेवून महाविद्यालयात शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे असे सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणा शिवाय महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना मिशन युवा स्वास्थ्य या उपक्रमाचे महत्व सांगत असताना दैनंदिन जीवनात आरोग्य कशाप्रकारे उत्तम रीतीने सांभाळले पाहिजे व त्या करिता लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वतःचे लसीकरण करून घेऊन समाजात विद्यार्थ्याने या लसीकरण संदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन केले. नुकतेच महाविद्यालय सुरु झाले असून जनजागृतीची मोहीम सर्वांनी हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
याप्रसंगी सेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक विभागाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ए. के. सिंग, सुभेदार हरीश वानिया, हवालदार नवनीत खाडे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एम. बी. कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इगतपुरी तालुका ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी, प्रा बी. सी. पाटील, प्रा. के. के. चौरसिया तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या मोहिमेत अनेक विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.