शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १
घोटी जवळ नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने देशी बनावटीचे कट्टे ( पिस्टल ) जिवंत काडतुसांसह हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे. संबंधित संशयित आरोपींवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि वाडीवऱ्हे येथील आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.
अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक एन. पी. गुरुळे, ठाकरे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस कॉन्स्टेबल पिंगळ यांचे पथक घोटी येथील वैतरणा फाटा परिसरात अवैध अग्निशस्त्राबाबत माहिती घेत होते. यावेळी मिळालेल्या मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे खंबाळेवाडी जवळील तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंबाळेवाडी शिवारात १) संदीप शिवाजी कोकणे वय ३० वर्षे रा. आडवण ता. इगतपुरी जि. नाशिक, २) अनिल एकनाथ येलमामे वय ३१ वर्षे रा. वंजारी गल्ली वाडीवऱ्हे ता. इगतपुरी जि. नाशिक यांनी पळुन गेलेला इसम नामे गोकुळ गणेशकर याचे कडुन सुमारे दिड ते दोन महिन्यापुर्वी विना परवाना बेकायदा अवैध २ देशी बनावटीचे कट्टे ( पिस्टल ), २ जिवंत काडतुसे असे विकत घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत २ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण किंमत रुपये ४१ हजार चे मिळुन आले आहेत. संशयित आरोपी संदीप शिवाजी कोकणे, अनिल एकनाथ येलमामे यांना ताब्यात घेण्यात आले. घोटी पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.