इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील कानाकोपऱ्यात आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांनी आज इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नाशिकचे युवा जिल्हाध्यक्ष गणेश गवळी यांनीही त्यांच्यासोबत प्रवेश केला. राज्यभरातील आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि विविध पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते.
लकी जाधव हे अकोले तालुक्यातील असून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींच्या ज्वलंत मोठा लढा उभारलेला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात त्यांनी आक्रमकपणे काम करून कार्यकर्त्यांचे जाळे विणलेले आहे. त्या माध्यमातून आदिवासी शेतकरी, विद्यार्थी आणि वंचित कष्टकरी नागरिकांच्या प्रश्नांना त्यांच्याकडून न्याय मिळाला आहे. आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून प्रदेश युवाध्यक्ष म्हणून त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर विक्रमी तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांना मिळाली होती. त्यांच्यासोबत राज्यभरातील आदिवासी पदाधिकाऱ्यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला बळकटी आली आहे. यासह आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढली असून निश्चितच काँग्रेसच्या जागा वाढतील असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
समावेशक विचारधारा आणि आदिवासींना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी इंदिरा काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. आगामी काळात आदिवासींच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे ह्या पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती लकी जाधव, गणेश गवळी यांनी बोलतांना दिली. दरम्यान असंख्य कार्यकर्त्यांनी लकी जाधव यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांच्यासोबत राहून तळागाळातील नागरिकांच्या सेवेसाठी वाहून घेणार असल्याचे स्पष्ट केले. प्रवेश सोहळ्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दनमामा माळी, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, युवा नेते राजू गांगड आदी उपस्थित होते.