किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरीतील वीस बंगला या भरवस्तीत बिबट्याच्या २ पिल्लांचे दर्शन झाले आहे. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे घटनेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इगतपुरीतील पच्छिम विभागात वीस बंगला येथे रेल्वेचे गोडाऊन आहे. या ठिकाणी जास्त प्रमाणात झाडे झुडपे असल्याने येथे बिबट्याच्या मादीने आश्रय घेतल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या विभागातील काही नागरिक रोज रात्री जेवण आटोपल्यानंतर वीस बंगल्यापर्यंत शतपावली करतात. त्यामुळे आज रात्रीच्या सुमारास काही नागरिक येथील रेल्वेच्या गोडाऊन जवळ शतपावली करीत असताना बिबट्याचे दोन बछडे निदर्शनास आले. त्यांचे छायाचित्रण काहींनी आपल्या मोबाईल मध्ये केले आहे हे छायाचित्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून, दुरध्वनी करून कळविण्यात आले आहे. परंतू येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून कानाडोळा करीत आहेत असे येथील नागरीक बोलत आहेत.
इगतपुरी शहरातील सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट, पोर्टर चाळ, आर पी एफ बॅरेक, गावठा परिसरात परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सेंट्रल रेल्वेच्या सिनिअर इन्स्टिट्यूट येथे बिबट्याने आपल्या 3 पिल्लांसह पुन्हा दर्शन दिले. परिसरात दहशत पसरली असून, कामावरून येत असताना एका युवकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. इगतपुरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. हा परिसर वर्दळीचा असून या पूर्वीही अनेकदा रात्रीच्या वेळेस कामावर जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र पिंजरे लावले असतानाही बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही. या परिसरातून येजा करणारे कामगार, शेतकरी वर्ग, शालेय विद्यार्थी धास्तावले आहेत. परिसरातील नागरिक सातत्याने बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करत आहे.