अंजनेरी येथील स्टंटबाज शपथविधी सोहळ्याला ६ ग्रामपंचायत सदस्यांचा तीव्र विरोध ; ग्रामस्थांचीही नाराजी : परस्पर एकतर्फी कामकाजामुळे अंजनेरीत २ गटाची निर्मिती

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. 13

ग्रामपंचायत कायद्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शपथ घेण्याची कोणतीही तरतूद नाही. अशा स्थितीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह उपसरपंच आणि काही सदस्यांनी सोमवारी शपथविधी सोहळ्याचे आयोजन केले आहे. निव्वळ स्टंटबाजीसाठी हा कार्यक्रम होत असून ग्रामपंचायतीच्या निम्म्या सदस्यांना विश्वासात न घेता लोकांच्या कररूपी पैशांचा दुरुपयोग करण्यात येत आहे. ह्या स्टंटबाजीला अंजनेरी ग्रामस्थ आणि ६ सदस्यांचा तीव्र विरोध असून ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या 6 सदस्यांचा अपमान आहे असा आरोप नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भास्कर लहांगे, रामदास बेंडकोळी, भाऊसाहेब शिद, चिमनराव शिद, जिजाबाई बदादे, वनिता चव्हाण यांनी केला आहे. आमदार, खासदार आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ह्या सोहळ्याच्या माध्यमातून लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अंजनेरी ही महत्वाची ग्रामपंचायत असून अद्याप विकासकामे सुरु झाले नाही. स्टंटबाजीच्या शपथविधीमुळे अंजनेरी गावात दोन परस्परविरोधी गट तयार झाले आहेत. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भास्कर लहांगे, रामदास बेंडकोळी, भाऊसाहेब शिद, चिमनराव शिद, जिजाबाई बदादे, वनिता चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांना विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी डावलले आहे. स्टंटबाज शपथविधी सोहळ्यात सहा सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर आयोजन करण्यात आले. खासदार, आमदार यांना ह्या कार्यक्रमात अंजनेरी गावातील दुहीचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यामुळे ६ ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी मनमानीचा कळस गाठला असून सरपंच यांचे पती या ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करत आहेत. यामुळे परस्पर निर्णय घेतले जात आहेत. ग्रामविकासासाठी सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच या सर्वांच्या प्रयत्नांनी विकासात्मक कामे मार्गी लावले जातात. मात्र अंजनेरी येथे एका गटाच्या विरोधात षडयंत्र रचून पद्धतशीरपणे लोक सहभागातून वेगळे ठेवले जात आहे. हे लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासण्यासारखे आहे असा आरोप सदस्य भास्कर लहांगे आदींनी केला आहे.

आम्हांला मतदारांनी विकासासाठी विश्वासाने निवडून दिलेले आहे. स्टंटबाज कार्यक्रमाचे आयोजन काही व्यक्तींनी सुडापोटी परस्पर ठरवून केलेले आहे..सरपंच, उपसरपंच व चार सदस्य हेच जर परस्पर गावचा कारभार करणार असतील तर आम्ही निवडून आलोय कशाला असा मोठा प्रश्न आमच्या पुढे पडला आहे. कार्यक्रमाला येणारा खर्च एखाद्या विकासकामासाठी लावला गेला तर तो सार्थकी लागेल. आम्हाला विश्वासात घेतलेले नसल्यामुळे आम्ही सहाही सदस्य उपस्थित राहणार नसून या कार्यक्रमाला आमचा सरळ सरळ विरोध दर्शवत आहोत.
- भास्कर लहांगे, ग्रामपंचायत सदस्य अंजनेरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!