जोपर्यंत तुम्हाला शोषण कळत नाही, तोपर्यंत साहित्यिकांच्या साहित्याला अर्थ नाही : कादंबरीकार राकेश वानखेडे ; प्रगतिशील लेखक संघ त्र्यंबकेश्वर शाखेचा साहित्य मेळावा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

प्रगतिशील लेखक संघ त्र्यंबकेश्वर शाखेचा साहित्य मेळावा मुरंबी येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी सवाद्य पुस्तकदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन पाच धान्याची पूजा म्हणजे धानपूजेने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कादंबरीकार राकेश वानखेडे होते. ते म्हणाले की, “जोपर्यंत तुम्हाला शोषण कळत नाही, तोपर्यंत साहित्यिकांच्या साहित्याला अर्थ नाही. शोषण समजून घेणे व ते साहित्यातून मांडणे यामुळेच समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देता येतो. तसे नसेल तर तुमच्या साहित्याला, लेखनाला काही एक अर्थ नाही”

“आदिवासी समाज जीवन आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी प्रा. मोतीराम देशमुख म्हणाले की “प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी विचारांची धार पक्की असली पाहिजे. चाकरी, ढोर मेहनत करणारा, उपेक्षित, गावकुसाबाहेरचा समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हावा, त्याला माणूस म्हणून जगता यावे यासाठी फुले-आंबेडकर यांनी शिक्षणाचा मूलमंत्र दिला. शिक्षणामुळेच लिहिण्याचा अधिकार उपेक्षितांना मिळाला. त्यातूनच साहित्यकृती निर्माण झाल्या. दलित साहित्य, त्यानंतर आदिवासी साहित्य निर्माण झाले. आदिवासी साहित्याची संख्या कमी असली तरी ते दर्जेदार असून नव-साहित्यिकांना दिशा देणारे आहे.” देवचंद महाले म्हणाले की, ” आदिवासी साहित्य ही शेती-मातीतून आणि कष्टातून निर्माण होते. त्यामुळे या साहित्य लेखनात सहजता आहे. नवनवे साहित्यिक निर्माण होऊन या साहित्याची चर्चा विद्यापीठापर्यंत जाते ही खरोखर अभिमानाची बाब आहे. “

कवी प्रमोद अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यावेळी ते म्हणाले की “संवेदनशील असणं आणि शोषणाविरुद्ध चीड येणं यातूनच खरी कविता फुलत जाते. पाना फुलांवर कविता लिहिणाऱ्यांना अन्याय अत्याचारावर कविता लिहिता येत नाही ही खरी खंत आहे. ग्रामीण बोली आणि आदिवासी बोली यातील फरक न कळल्यामुळे अनेक आदिवासी कवींना बोलीभाषेतील कविता लिहिता येत नाही. आदिवासी बोलीतील अस्सल साहित्य निर्माण करता आले पाहिजे.” यावेळी अंबादास खोटरे, उत्तमकुमार कामडी, सीमा खोटरे, गणेश बारगजे, पवन दळवी, तानाजी सावळ, दशरथ भोये,गौरव कोहंकिरे, कृष्णा राऊत, प्रशांत गायकवाड, प्रकाश कुंभार, देविदास शिरसाट, रघुनाथ महाले, रोहिदास डगळे, आधी कवींनी सामाजिक विषयावरील कविता सादर केल्या. कविंना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन नारायण कुवर यांनी केले. यावेळी स्वागताध्यक्ष देविदास जाधव, सरपंच हिरामण राऊत, पोलीस पाटील गोपाळ राऊत, साहित्यिक संजय दोबाडे, तुकाराम चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!