लोकांच्या समस्या योग्य व्यासपीठापर्यंत पोहोचवून त्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असणे हे पत्रकाराचे खरे काम : इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे यांचे प्रतिपादन

केपीजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची कार्यशाळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

पत्रकारिता हा व्यवसाय नसून सेवा आहे. लोकांच्या समस्या योग्य व्यासपीठापर्यंत पोहोचवणे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे हे पत्रकाराचे खरे काम आहे. व्यवसाय आणि समाजसेवा असे दुहेरी समाधान फक्त आणि फक्त पत्रकारितेतच मिळू शकते. पत्रकारितेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी सामाजिक संवेदना नेहमी लक्षात ठेवून पत्रकारिता करावी असे मार्गदर्शन इगतपुरीनामा न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक भास्कर सोनवणे यांनी केले.

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित प्रसारमाध्यमे आणि लेखन कौशल्ये या विषयावरील कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी पत्रकार भास्कर सोनवणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. याप्रसंगी माध्यम अभ्यासक पत्रकार सागर वैद्य, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते.

भास्कर सोनवणे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पत्रकारिता करीत असताना अनेक लोक दुखावले जातात. असे असले तरी आपण चांगले काम वाचकांपर्यंत पोहोचवित असतो. या कार्याची दखल वाचक आणि समाज घेत असतो. हे समाधान ऊर्जा निर्माण करण्याचे काम करत असते. याप्रसंगी माध्यम अभ्यासक पत्रकार सागर वैद्य यांनी आपल्या मनोगतात पत्रकारिता करत असताना जे अनुभव आलेत ते सांगून हे काम करताना कशाप्रकारे सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य करता आले ह्याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विशद करून विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमातील चांगल्या संधींचा आपले करिअर घडविण्यासाठी उपयोग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य  प्रा. देविदास गिरी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. जी. एस. लायरे यांनी केले. कार्यक्रमाला इगतपुरीचे पत्रकार वाल्मिक गवांदे, प्रा. डी. डी. लोखंडे, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. ए. एस. वाघ, प्रा. व्ही. डी. दामले, प्रा. एस. एम. चव्हाण, प्रा. बी. एम. जाधव, प्रा. आर. एस. गायकवाड, प्रा. जी. एस. सौंदाणे, प्रा. ए. एस. पाटील, प्रा. एस. ए. जगताप व विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!