सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 84 ग्रामपंचायतीमधील कर्मचारी, शिपाई, कामगार, पाणीपुरवठा कर्मचारी, लिपिक यांनी विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, हरसूल गटाचे नेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, सभापती मोतीराम दिवे, काँग्रेस नेते मिथुन राऊत यांना निवेदन देण्यात आले.
तुटपुंज्या पगारावर काम करत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांचे गाऱ्हाणे शासन दरबारी पोहचवून त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्याचा विचार केला जावा असे आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी तात्काळ त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व मागण्याबाबतचे लेखी पत्र तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना काढले असून योग्य तो निर्णय होईल असे ते म्हणाले. यावेळी विनायक माळेकर यांनी आंदोलकांसाठी मंडपाची व्यवस्था केली होती. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे, तालुकाध्यक्ष निवृत्ती वाघ, तालुका उपाध्यक्ष यादव गावीत, सचिव लालू आहेर आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.