स्व. नारायण धोंडू कडू यांच्या वर्षश्राद्धनिमित्त किर्तनसेवा : संसारात गुंतून न राहता परमार्थाने सुखाची प्राप्ती करावी : रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर

अभंग : पक्षी अंगणी उतरती | ते का गुंतोनी राहती ||
तैसे असावे संसारी | जोवरी प्राक्तनाची दोरी ||
वस्तीकर वस्ती आला | प्रातःकाळी उठोनी गेला ||
एकाजनार्दनी शरण | ऐसे असता भय कवण ||

कीर्तनकार : रामायणाचार्य हभप विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर

“प्रस्तुत अभंगातून शांतीब्रम्ह एकनाथ महाराज आपल्याला संसार कसा करावा नव्हे नव्हे प्रपंचात परमार्थ कसा करावा याची शिकवण देतात. वारकरी संतांनी आपला प्रपंचच परमार्थ केला आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी जगाच्या पुढे मांडला. संसाराची अचूक बैठक असल्याशिवाय आपण परमार्थात प्रवेशच करू शकत नाही. परंतु जीवन जगत असताना सगळ्यात मोठे भय प्राण्याला कोणतं असेल तर ते मृत्यूचे आहे. आणि हे भय जावं अस वाटत असेल तर अखंड भगवंतनामाचे चिंतन करावे लागेल. ज्याला मरेपर्यंत आपल्याला जगायचच आहे हे कळलं तोच या जगात भयमुक्त झाला. परंतु या मरणाचे भय जरी आपण बाळगत असलो तरी संतांनी मात्र तेच मरण आपला सोहळा केलाय. हीच वारकरी संतांनी विश्वात केलेली सर्वात मोठी क्रांती आहे. मग संसार करत असताना आणि हे भय घालवण्यासाठी काय केले पाहिजे याकरिता नाथ महाराज दोन दृष्टांत आपल्यासमोर मांडतात की जेव्हा अंगणात दाण्यांचा सडा पडलेला असतो तेव्हा आकाशात उडणारा पाखरांचा थवा ते दाने टिपण्यासाठी येतो आणि त्यांचे पोट भरेपर्यंत ते दाणे टिपतात. आणि पोट भरल्यावर कितीही दाने शिल्लक राहले तरी त्या मोहात न गुंतता ते आकाशात उडून जातात. आणि दुसरा दृष्टांत म्हणजे वाटसरू हा चालत राहतो आणि संध्याकाळ झाली की तो थांबण्यासाठी एखाद्या घराचा सहारा घेतो. रात्रभर तिथे थांबतो आणि ज्याच्या घरी थांबतो त्याच्याशी रात्रभर चर्चा करतो. पण तो वाटसरू कुठल्याही संगतीच्या बंधनात न अडकता दिवस निघाला की निघून जातो. त्याप्रमाणे संसारात विषयरूपी सर्प आहे आणि त्या सर्पाला हे दोन दात आहेत एक म्हणजे मोह आणि दुसरा म्हणजे संगतीच बंधन म्हणून हे दोन्हीही घालवले की संसारच परमार्थ होतो. ज्ञानाने चेतनत्व घालवा, कर्माने जडत्व घालवा आणि भक्तीने संगतीचा त्याग करा. आणि आपल जीवन उज्वल बनवा. या उज्वल झालेल्या जीवनातून सद्गुरूची शरणागती करा. मग असा धन्य पुण्य स्वरूप संसार केल्यावर आत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती झाल्यावर भयच शिल्लक राहत नाही.” रामकृष्णहरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!