
इगतपुरीनामा न्यूज, दि. 12
इगतपुरी तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेमधल्या झारीतील शुक्राचार्यांना आत्मचिंतन करायला लावणाऱ्या दरेवाडी जिल्हा परिषद शाळेत आज एक महिन्याने घंटा वाजली. अनेक प्रयत्न करूनही ही शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे कारस्थान 43 विद्यार्थ्यांनी मंगळवारी हाणून पाडले. आज ही शाळा चिमुकल्यांच्या गलबलाटाने गजबजून गेली. अधिकाऱ्यांनी समक्ष भेट देऊन याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या पत्रात शब्दांचा खेळ केलेला असला तरी शाळा सुरु झाल्याचा आनंद पालकांनी व्यक्त केला. आगामी काळात ही शाळा किंवा कोणतीही शाळा बंद करण्याचा चुकीचा निर्णय घेतल्यास थेट मुख्यमंत्री निवासात शेळ्या मागण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी दिली.. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शाळा सुरु केल्याबद्धल शिक्षण विभागाचे आभार मानले असले तरी शाळा बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आंदोलक पालक म्हणाले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर करण्यासाठी तालुक्याच्या शिक्षण विभागाने हालचाली करू नये. असे झाल्यास संपूर्ण तालुक्यातून दप्तर जमा करून शेळ्या मागण्यासाठी प्रखर आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी दिला आहे. सीताराम गांवडा, गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, सोमनाथ आगिवले, बाळू गावंडे, काळू गांवडा, लक्ष्मण गावंडे, लहू गावंडे, कृष्णा गावंडे, आनंद आगीवले, राजेंद्र मेंगाळ, गोविंद गावंडे, यशोदाबाई गावंडे, नथु सावंत, मथुरा भगत आदी आंदोलकांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.