लेखन : प्रमोद पांडुरंग परदेशी, राज्य आदर्श शिक्षक
भगूर केंद्राच्या केंद्रप्रमुख आदरणीय सौ. माया शिंदे मॅडम आज सेवानिवृत्त झालेत. भगूर केंद्रातील शिक्षकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत एक नयनरम्य सोहळा संपन्न केला. खरं तर निरोप नव्हताच हा…होता प्रेमाच्या नात्यातील आपुलकीचा सोहळा. केंद्रप्रमुख सौ. माया शिंदे मॅडम ह्या अधिकारी म्हणून कधीच वागल्या नाहीत. एक कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या जबाबदार कुटुंब प्रमुख होत्या आणि आहेत. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो केंद्रात केंद्रप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ आम्हा सर्व शिक्षकांना सुवर्ण काळ असा होता. त्यांच्या नेतृत्वात केंद्राने जिल्हास्तरावर अनेक बहूमान मिळविले. तालुक्यात नेहमीच नांदगाव सदो केंद्र अव्वल स्थानी असायचे आणि आजही आहे. सौ. माया शिंदे मॅडम ह्या नाशिक लोकसभेचे लोकप्रिय विद्यमान खासदार हेमंत अप्पा गोडसे यांच्या मोठ्या बहीण….राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील मॅडम असल्याने परंतु आपल्या कामाच्या शैलीत कोणताच बडेजाव जाणवला नाही. त्यांचे कार्य त्याच्या कामातून उठून दिसले. केंद्रातील धामडकी, गव्हांडे, जामुंडे, कामाडवाडी अशा अतिदुर्गम म्हणजेच त्यांच्या कार्यकाळात ह्या गावांना रस्ता नव्हता अशा ठिकाणी पायपीट करून शाळा भेटी देऊन दुर्गम शाळांना तालुक्यात ओळख निर्माण करून दिली. दुर्गम भागातील शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहन देऊन डोंगर दऱ्यातील शाळा तालुक्यात उठून दिसत होत्या. आम्हाला सर्व शिक्षकांना नेहमीच अभिमान वाटावे असे नेतृत्व म्हणजेच आमच्या लाडक्या केंद्रप्रमुख शिंदे मॅडम. मॅडमच्या कार्यकाळात केंद्रात समाजसहभागातून अनेक शाळांचा विकास झाला. त्यांच्या बदलीने आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटायला लागले. पण त्यांच्या बदली नंतर आम्हाला त्यांच्या सारखेच प्रेमळ नेतृत्व श्री. श्रीराम आहेर सर यांच्या कडून मिळत आहे. आजचा सोहळा पाहिल्यावर भगूर केंद्रातील सर्व शिक्षकांच्या मनोगतातून शिंदे मॅडम यांचे प्रचंड कौतुक पाहुन भारावून गेलो. असे असाधारण नेतृव होणे नाही. प्रत्येक शिक्षकांच्या तोंडून निघणारे शब्द हे शिंदे मॅडम यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त होतांना दिसले. केंद्रातील शिक्षक जितेंद्र मानकर सर यांनी शिंदे मॅडम यांच्या साठी गायिलेल्या गीतातून सभागृहात प्रत्येकाच्या डोळ्यात ओलावा निर्माण केला. अश्रू अनावर झालेल्या महिला भगिनी पाहिल्यावर असे नेतृत्व होणे नाही. हे चित्र डोळ्यांनी अनुभवले.