शिक्षण दैवाचे की कर्माचे ?

लेखन - पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक, दै. अजिंक्य भारत
संवाद - 9892162248

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना ज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या, अर्थात हे काम तत्कालीन मानव संसाधन विकासमंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे होते. काही विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम सुरु केला मात्र काही वर्षातच त्याच्या शाखा चालेना झाल्यात. हा अनुभव पुढ्यात असताना पुन्हा केंद्रातील भाजप सरकारने कुंडल्या बाहेर काढल्या आहेत. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात आता पुन्हा ज्योतिष हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. हे सरकार दैववादी लोकांचे आहेच आता त्यांनी येणार्‍या पिढ्या सुद्धा कशा दैववादी होतील याची तजवीज करून ठेवली आहे.
     
मुळात ज्योतिष हे कुठलेही शास्त्र नाही, घरांच्या तोडफोडीला जसे वास्तुशास्त्र संबोधले जाते तसेच या फल ज्योतिषाला ज्योतिषशास्त्र त्यांनीच म्हणायला सुरुवात केली आहे. एखादी ज्ञानशाखा विद्यापीठात चालवली जाते तेव्हा ती सर्वसामान्य होण्यापूर्वी तिला अनेक निकषातून बाहेर पडावे लागते. काही कसोट्यांवर स्वतःला सिद्ध करावे लागते. त्या विषयाचा एखादा सिद्धांत काश्मीर ते कन्याकुमारी एकच असावा लागतो. जगात कुठेही त्याचे सिद्धांत सारखेच असावे लागतात, यापैकी काहीच ज्योतिषबाबत सत्याच्या कसोटीवर उतरत नाही. त्यामुळे या कथित ज्योतिषशास्त्राला कोणताही वैज्ञानिक आधार अजून तरी मिळाला नाही.
    
लोक मोठा गोंधळ करीत असतात. त्यांना खगोल आणि फल ज्योतिष यांच्यातला फरक कळत नाही. ज्योतिष खोटे असेल तर मग पंचांगात जे सांगितले जाते ते खरे कसे ठरते असा भाबडा प्रश्न लोक करीत असतात. त्यांना हे समजावून सांगण्याची गरज आहे की पंचांगात 60 टक्के बाबी आताच्या विज्ञान शाखा असलेल्या खगोलशास्त्र यातून चोरलेल्या असतात. अमावस्या, पौर्णिमा, सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहण, भरती ओहोटी यांसारख्या असंख्य बाबींसाठी पंचांगकर्ते सरळ खगोलशास्त्र वापरतात याची फार कमी लोकांना माहिती आहे हे लक्षात घायला हवे. उद्या तुमच्या भाग्यात काय लिहिले आहे किंवा जीवनात काय घडणार आहे हे सांगण्याची कोणतीही यंत्रणा जगभर कुठेही निर्माण झाली नाही.
      
कोणतीही व्यक्ती झोपेतून उठल्याबरोबर वृत्तपत्र हाती घेत असेल तर त्यापैकी 90 टक्के व्यक्ती राशीभविष्य वाचतात. याचा अर्थ उद्या आपल्या जीवनात काय घडणार आहे हे जाणून घेण्याचे कुतूहल प्रत्येकाला आहे. त्यानुसार राशी बघितल्या तर सर्वाधिक विनोदही याच राशी भविष्याबाबत निर्माण झालेले असतात. कोरोनाकाळात लोक घरात बंदिस्त असताना राशीत प्रवासाचा योग लिहिलेला असतो. थोडक्यात राशीभविष्य ही शुद्ध फोकनाड आणि ठोकताळे असतात हे शहाण्या व्यक्तींना सांगण्याची गरज पडत नाही. ज्यांचा आपल्या कर्तृत्वावर भरोसा नसतो अशी कोट्यवधी माणसे दररोज राशीभविष्य वाचत असतात.
    
सरकार कोणाचेही असो त्यांनी भावी पिढ्यांना उजेडाकडे न्यायचे असते मात्र हे सरकार उलटा प्रवास कार्यक्रम आखताना दिसते. आपल्या देशात दैववादी मानसिकतेने सर्वव्यापी नुकसान केले आहे. दैववादी मानसिकता लढायला परवानगी देत नाही. दैवात जे असेल ते मिळेल या आशेवर राहणारी पिढी आपल्या देशाच्या विद्यापीठातून बाहेर पडणार असेल तर देशात पुरुषार्थ गमावून बसलेल्या लोकांच्या फौजा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत याचे भान केंद्र सरकारला आहे की नाही? नशीब आणि कर्तृत्व या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जो नशीब, भाग्यावर भरोसा ठेवतो तो कर्तृत्व नाकारीत असतो.
     
भाग्य याचा अर्थ मनुष्य जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याच्या जीवनात काय घडेल हे आधीच लिहून ठेवणे होय. जर काही वेळासाठी हे मान्य केले तर जे लिहिलेले असेल तेच जर घडणार असेल तर प्रयत्न तरी कशासाठी करायचे हा विचार येणारच म्हणून ज्योतिष माणसाला दैववादी बनवते, प्रयत्न करायचे नाकारते. म्हणूनच आपल्या देशात गेल्या शंभर वर्षात कुण्या शास्त्रात संशोधन केल्याचे नोबेल पारितोषिक कुणाला मिळू शकले नाही. आता तर ते मिळूच नये अशी व्यवस्था केंद्रातले सरकार निर्माण करीत आहे. भाजपचे सरकार आणि लोक ज्या स्वामी विवेकानंद याना आदर्श मानतात त्या विवेकानंद याची ज्योतिषबद्दल काय मते आहेत हे तरी माहीत करून घ्यायला हवी होती.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!