युवासेनेकडून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा
इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यातील विविध भागात महावितरण कंपनीच्या विद्युत वितरण विभागाने पूर्वसूचनेशिवाय भात पीक बहरत असताना कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडला आहे. वीज जोडण्या तोडण्याची मोहीम भात उत्पादक शेतकऱ्यांच्या चांगलीच मुळावर घाला घालणारी ठरणार आहे. यामुळे मोठ्या कष्टाने उभे राहिलेले भात पीक नष्ट होण्याच्या धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी विद्युत वितरण विभागाच्या या बेदरकार धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांनी गांधीं जयंतीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे संतप्त शेतकऱ्यांनी गांधीगिरी मार्गाने धरणे आंदोलन केले. आम्ही सर्व शेतकरी थकबाकी भरण्यास तयार असून भात पीक आल्यावर विक्री होईपर्यंत आम्हाला २ महिने मुदत द्यावी. मुदत न दिल्यास भात पिकाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पुढील काळात थकबाकी भरणे शक्य होणार नसल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान वारुंगसे यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास युवासेना आक्रमक आंदोलन करील असा इशारा देण्यात आला आहे.
आधीच कोरोना महामारी, पाण्याची टंचाई, शेतमालाला अत्यल्प भाव आदी कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सावरणे आवश्यक असतांना वीज जोडण्या तोडण्याचे धोरण शेतकऱ्यांचा अंत पाहणारे आहे. वीज मंडळाने याबाबत संतप्त शेतकऱ्यांना २ महिने मुदत देऊन वीज जोडणी पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पिके पाण्याविना नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. ह्या पार्श्वभूमीवर गरीब शेतकऱ्यांचे तोडण्यात आलेली कृषी पंप वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान वारुंगसे यांनी महावितरण कंपनीला दिला आहे. धरणे आंदोलन प्रसंगी लहानू वारूंगसे, परसराम वारूंगसे, साहेबराव आव्हाड, अनिल वारूंगसे, आत्माराम वारूंगसे, सोमनाथ वारूंगसे, शिवाजी वारुंगसे, नारायण आव्हाड, ललित शिंदे, रमेश वारूंगसे, रामदास खराटे, विलास वारुंगसे, संदीप वारूंगसे, श्रीकांत वारुंगसे, धनाजी वारूंगसे आदी शेतकरी बांधव हजर होते.
इगतपुरी तालुक्यात कृषी पंपाची सक्तीने वीज बिल वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांवर लादलेली अव्वाच्या सव्वा बिले वसूल करण्यासाठी महावितरण रडीचा डाव खेळत आहे. भरमसाठ वीज बिल आकारून सक्तीची वसुली केली जात आहे. व ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही, अशा शेतकऱ्यांची कृषिपंपाची वीज जोडणी तोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र ह्यामुळे शेतकरी संपणार आहेत. म्हणून भात पिकाची विक्री करून मिळालेल्या उत्पन्नात थकबाकीची रक्कम भरण्यासाठी २ महिने मुदत देणे आवश्यक आहे.
- समाधान वारुंगसे, युवासेना उपतालुकाप्रमुख