जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त : जेष्ठ नागरिकांना हवाय मायेचा आधार

– उत्तमबाबा गांगुर्डे, नाशिक जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त संघटना

१ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५ वयोगट आणि ७५ आणि त्यापुढील वयोगट अशा तीन प्रकारांत ज्येष्ठांची विभागणी होते. आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण, वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे. या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात.

म्हातारपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण असते असे म्हणतात. बहुतांशवेळा हे मनाला पटतेदेखील! लहान मुलांना जसे गोळ्या-चॉकलेट, आईस्क्रीम हवीहवीशी वाटतात, तसेच वृद्धांनाही ती प्रिय असतात. परंतु त्यांच्या या आवडीमागील कारण म्हणजे त्यांना दात नसल्याने, असलेले दात पडून गेल्याने चावण्यास व पचण्यास हलके असे खाद्यपदार्थ त्यांना आवडतात. सुरकुत्या पडलेली ती त्वचा, धूसर झालेली नजर आणि कानाला कमी ऐकू येत असले तरीदेखील सर्व काही जाणणारी ही मंडळी घराघरात असतात. आपल्या नातवंडांसाठी जणू काही ते देवाकडून आपल्या वाट्याचेही दीर्घायुष्य मागत असतात. घरातील सर्वांनी हसत-खेळत, सुखी, आनंदी राहावे असे त्यांना वाटत असते. कारण, डोळ्यासमोर घडणारी सासू-सुनांची, नवरा-बायकोची, वडील-मुलाची भांडणे त्यांना नकोशी झालेली असतात. भांडणे करून काहीच उत्पन्न होत नाही. हाती येतो तो अबोला व नात्यातील दुरावा! हे त्यांना एव्हाना पाठ झालेले असते. कारण, त्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवलेले असते. अनुभव घेतच त्यांना वृद्धाप्य आलेले असते. आपण केलेल्या चुकांची पुनरावृत्ती आपल्या मुलांनी, नातवंडांनी करू नये हीच त्यांची इच्छा असते.

वृद्धाश्रमातील आजी-आजोबा रोज आज कुणीतरी आपल्याला भेटायला येईल अशी वाटत पाहत नसतात, त्यांना ओढ असते ती त्यांच्या आपल्या माणसांची! कधीतरी याच वृद्धाश्रमात आपल्याला सोडून गेलेली आपली मुले आपल्याकडे परत येतील अशी भाबडी आशा त्यांना असते. हाच विचार करत ते आपल्या मरणाची वाट पाहत दिवस ढकलत असतात. त्यांच्या मुलांनी त्यांना कितीही वाईट वागणूक दिलेली असली तरीदेखील ते मात्र त्यांना आशीर्वादच देत असतात. शेवटी आई-वडिलांचे ते निस्वार्थी प्रेम असते. पण, आजकालच्या या नवीन आई-वडिलांना अर्थात त्याच आजी-आजोबांच्या मुलांना मात्र आपल्या लहानग्यांमध्येच भविष्य दिसत असते. भविष्याकडे धावताना भूतकाळातील आपल्या सावलीरुपी आई-वडिलांना मात्र ते कधीच विसरलेले असतात. हे तितकच सत्य आहे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व जेष्ठ श्रेष्ठ सन्माननीय बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा…! आनंदी राहा सुखी रहा हीच प्रार्थना…! सेवानिवृत्त संघटना सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!