१० लाख वीजबिल थकवणाऱ्या बड्या ग्राहकाला वीज मंडळाकडून पायघड्या : थकबाकी वसुल न करता नवीन कनेक्शन देणाऱ्या नाशिकच्या अभियंत्यांना निलंबित करण्याची मनसे वीज कामगार सेनेची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

महावितरणच्या नाशिक विभागात १० लाखांच्यावर थकबाकी असणाऱ्या बडे ग्राहक आहेत. त्यांच्याकडून ती थकबाकी वसुल केलेली नाही. याउलट त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्याच जागेवर त्यांना दुसऱ्या नावाने नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे. यामुळे महावितरण कंपनीला करोडोंचा चुना लावल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या दोषी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्यावतीने  देण्यात आला आहे.
    
महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिकच्या शिलापुर परिसरातील एका ग्राहकाचे १० लाख रुपये थकबाकी बिल आहे. असे असतांना ते वसुल न करता या भांडवलदाराची गैरसोय नको म्हणुन त्याला त्याच जागेवर नवीन वीज कनेक्शन दिले आहे. ते सुद्धा पूर्वीचा 85 KW चा लोड कमी करून 10 KW एवढा कमी करून दिला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे मुख्य अभियंता यांना प्रत्यक्ष भेटुन व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्राद्वारे निदर्शनास आणुन दिले आहे. तरीही नाशिक वीज प्रशासन याकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब उघड केली त्यांना महावितरणच्या अभियंत्यांनी धमकी देणे सुरू केले असल्याचेही निवेदनात नमुद आहे.

महावितरण कंपनीकडून १० लाखांच्यावर थकबाकी असणाऱ्याना सोडुन जात असल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे ५०० ते १००० अशी थकबाकी आहे अशा गरीब ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे हे गैर असुन या विरोधात मनसेने कडक भूमिका घेतली आहे. मनसे वीज कामगार संघटनेचे नेते शिरीष सावंत यांनी मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. हे गैरकृत्य करणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून आर्थिक ढबघाईला आलेल्या महावितरणला वाचवण्यासाठी अशा गैरकृत्याला आळा बसवावा. कमी थकबाकी असणाऱ्या गोरगरिबांच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडायचे व बड्या धनदांडग्यांना पाठीशी घालुन त्यांच्या सोयीने काम करायचे. हे महावितरण कंपनीच्या दृष्टीने चुकीचे असुन कंपनीचा महसुल बुडवणाऱ्या भ्रष्ट अभियंत्यांना निलंबित करून कारवाई करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असा इशारा मनसे वीज कामगार सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
        
नाशिकचे मुख्य अभियंता यांच्या भेटी प्रसंगी कार्याध्यक्ष राकेश जाधव, सरचिटणीस संतोष विश्वेकर, उपाध्यक्ष रामनाथ साबळे, मुंबई विभाग अध्यक्ष अजय शिंदे, सचिव धीरज रोकडे, नाशिक परिमंडळ अध्यक्ष दिनकर रोकडे, सचिव अविनाश जावरे, नाशिकचे पदाधिकारी सताळे, वसंत इंफाळ, शिवाजी मोरे, दौलत तुंगार, संदीप आडके, जितेंद्र बोरोले, विनोद उकार्डे, सोमनाथ जाधव, संदीप वडजे, अनवर तडवी आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!