निसरडी पायवाट..निसर्ग..डोंगरं आणि दऱ्या..मोठमोठे खाचखळगे, दगडं, चिक्खल…ओढे, नाले अन जंगल ओलांडत जिल्हाधिकाऱ्यांचा ४ किमी थरारक प्रवास : इगतपुरीच्या अतिदुर्गम आदिवासी भागात महसूल सप्ताह अंतर्गत जनसंवाद कार्यक्रम यशस्वी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – काय तो पायवाटेचा निसरडा रस्ता… काय तो निसर्ग… काय ती डोंगरं आणि दऱ्या…. मोठमोठे खाचखळगे, दगडं, चिक्खल…अन ओढे, नाले, जंगल असा ३ ते ४ किलोमीटरचा थरारक पायी प्रवास करीत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथे भेट दिली. जिल्हाधिकारी यांच्यासह सोबत असणाऱ्या सर्वच शासकीय अधिकाऱ्यांना खैरेवाडीचा प्रवास प्रथमच घडला. यानिमित्ताने ह्या भागातील आदिवासी नागरिकांच्या व्यथा आणि जन्मोजन्मीच्या दुखण्याची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली. ह्या वाडीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या माध्यमातून पक्का रस्ता आणि विविध शासकीय योजनांचा फायदा होणार आहे. नाशिकचे नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महसूल सप्ताह अंतर्गत जनसंवाद कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे ग्रामपंचायत हद्धीतील खैरेवाडी ही अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल आदिवासी वाडी निवडली. या वाडीत जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाडीकडे जाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतर स्वतः जंगलातून पायपीट करत पार पाडले. तीन ते चार ओढे व नाले यांच्या पाण्यातुन वाहणाऱ्या प्रवाहातून मार्गक्रमण करीत खैरेवाडी गाठले.

ह्या दौऱ्यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी  रवींद्र ठाकरे, इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आदी शासकीय कर्मचारी उपस्थित होते. खैरेवाडी येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. वाडीतील आदिवासी ग्रामस्थ आणि जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे नियोजन केले. महत्त्वाचे या वाडीवर जाण्यासाठी रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईसाठी उपाययोजना करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी हितगुज साधून समस्या व उपायोजना यावर चर्चा करण्यात आली. येथील लोकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून संजय गांधी योजना, शिधापत्रिका, आधार कार्ड, शेततळे, शैक्षणिक योजना, आदिवासी विकास योजना, घरकुल योजना, इतर विभागांच्या योजना असा सविस्तर आढावा घेतला. खैरेवाडीच्या सर्व समस्यांवर मार्ग काढण्यासाठी नियोजन करण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!