उद्यापासून जिल्हाभर ठप्प झालेले कोविड लसीकरण होणार सुरू
इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे कोविड लसीकरण सत्राच्या सरकारी कामकाजात हस्तक्षेप करुन महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी यांना जीवघेणा हल्ला करुन मारहाण करणाऱ्या २ संशयित व्यक्तींवर अखेर कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोग्य कर्मचारी महेंद्र हिंमतराव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४, वैद्यकीय सेवा अधिनियम कलम ४ अन्वये ज्ञानेश्वर किसन आव्हाड, संतोष किसन आव्हाड दोघे राहणार पास्ते ता. सिन्नर ह्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्यापासून जिल्हाभरात ठप्प झालेले कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे सर्व संघटनांनी घोषित केले आहे.
ह्या प्रकरणी कलम ३५३ प्रमाणे संशयित व्यक्तींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संवर्ग संघटना एकत्र आल्या होत्या. त्यांनी जिल्हा परिषद आवारात घटनेचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन दिले होते. यासह लसीकरण केंद्राला पोलीस संरक्षण मिळावे, सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन संघटनाची बोलणीसाठी सर्व खाते प्रमुख यांनी वेळ द्यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संशयित व्यक्तींवर 353 कलम लावण्यासंदर्भात सिन्नर पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दाखल करणे संदर्भात दुजोरा दिला होता.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना पदाधिकारी त्यात बाळासाहेब ठाकरे, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब कोठुळे हे राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष विजय सोपे, राजू बैरागी, नर्सेस संघटनेच्या शोभा खैरनार, वैशाली पवार, मधुकर आढाव, सर्व संघटना पदाधिकारी यांनी आज दुपारी २ पासून रात्री ८ वाजेपर्यंत सिन्नर पोलीस स्टेशन येथे थांबले. पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्याशी चर्चा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे गुन्हा दाखल करून त्याबाबत कार्यवाही करत असल्याचे सांगण्यात आले
यापुढे सर्व कर्मचारी वर्गाने आपणास नेमून दिलेले शासकीय निकषाप्रमाणे सर्व कामकाज करण्यात यावे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी लसीकरणाचे काम सुरू करणार असल्याबाबतचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा नासिक व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस कर्मचारी संघटना व सर्व संवर्गीय संघटना यांनी कळवले आहे.
ह्या प्रकरणात सर्व संघटना एकत्र झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सर्व संवर्गीय संघटनांचे सर्वांचे आभार मानलेले आहे.