न थांबता न थकता प्रत्येक क्षण शिक्षणावरच व्यतीत करणारे शैक्षणिक क्षेत्रातील “कोहिनुर” अशोक कुमावत : सामान्य शिक्षक  व्हाया राष्ट्रपती पुरस्कार ते विस्ताराधिकारी आणि शिक्षणाचा दीपस्तंभ

राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक, लेखक, कवी, मोटीव्हशनल स्पीकर, सूत्रसंचालक अशोक कुमावत यांचा सेवापूर्ती सोहळा प्रचंड उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित खासदार, आमदार, नगरसेवक, शिक्षक जनसमुदाय, शिक्षक नेते, समाजातील राज्यभरातील कुमावत बांधव, साहित्य क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते ही सर्व आयुष्यभर केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. सेवानिवृत्तीचा दिमाखदार सोहळा क्वचितच शिक्षकांच्या नशिबात असतो. यावरूनच अशोक कुमावत हे शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर असल्याचे सिद्ध होते. ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते याप्रमाणे कार्य करणारे अशोक कुमावत शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर आहेत. हे व्यक्तिमत्व राष्ट्रपती पुरस्कार विजेते असून सेवापुर्ती सोहळ्यानिमित्ताने त्यांच्या ३६ वर्षाचा अविस्मरणीय विहंगम लेखाजोखा मांडणे यानिमित्ताने क्रमप्राप्त ठरते. शिक्षणांत अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्परांची अनास्था । या दृष्टीने शिकवोनि समस्तां । वळण द्यावें नैतिकतेचें पुरस्कार करणाऱ्या अशोक कुमावत यांचे दैदिप्यमान कार्य सर्वांसाठी दिपस्तंभ ठरेल यात शंका नसावी.

नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव ह्या खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात लक्ष्मण बेलदार/ कुमावत या गवंडी कामगाराच्या अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरात अशोक कुमावत यांचा जन्म झाला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही नसल्याचे बाळकडू आई वडिलांनी त्यांच्या नसानसात भिनवले. अत्यंत हलाखीचे जीवन, दोन वेळचे जेवण कधी माहित नाही, मोलमजुरी करत, रोहयोच्या कामावर मिळणारी सुकडी हेच सायंकाळचे ह्या कुटुंबाचे जेवण. तीन भाऊ, चार बहिणी असे सात भावंडांचे मोठे कुटुंब असून सणावाराला अंगात कधी नवा कपडा माहित नाही. आयुष्यभर फाटक्या वस्त्रात काढलेले लक्ष्मण बेलदार हे वडील संसाराचा गाडा हाकताना कधी डगमगले नाही. कष्टाची अन संस्काराची भरभक्कम शिदोरी मुलांना देणारा गांजलेला हा शेतमजूर मात्र शिक्षणाचे महत्त्व जाणत होता. या भोळ्या भाबड्या आई वडिलांनी आपल्या मुलांना मात्र शिक्षणाच्या वाघिणीचे दूध पाजले. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर | नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..! याप्रमाणे त्यांचा मोठा मुलगा अशोक कुमावत १९८९ मध्ये  कोटमगाव ता. निफाड येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागला. तसे या अवलियाने मागे वळून बघितलेच नाही. शिक्षणीं सांभाळोनि तनुमन । करावें मुळीबाळीस विद्वान । अंगीं असावें शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया प्रमाणे स्वतः शिक्षण घेत घेत दोन्ही भावांनाही आदर्श शिक्षक बनवले. बहिणी भाचे यांना शिकवून कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते सतत संघर्ष करत राहिले. एकच ठावे काम मला | प्रकाश द्यावा सकलांना, कसलेही मज रूप मिळो | देह जळो अन् जग उजळो || या ओळींप्रमाणे त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या जीवनात अखंडित प्रकाश पेरला. त्यानंतर निफाड तालुक्यात ब्राम्हणगाव, विंचूर, मरळगोई खुर्द या शाळेवर, ठाणगाव ता. येवला आणि शेवटी इगतपुरीतील माणिकखांब या गावात आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारली. जिथे काम केले त्या प्रत्येक गावातील विद्यार्थी आणि गावकरी यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. शाळांच्या विकासासाठी आटोकाट प्रयत्न करून शाळांचा कायापालट करण्यात अशोक कुमावत यांचा सिंहाचा वाटा होता. प्रत्येक शाळा गुणवत्ता विकासात प्रथम येण्यासाठी त्यांनी दिलेले मोलाचे योगदान अविस्मरणीय ठरावे. शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने विद्यार्थी यशस्वी करून गुणवत्ता यादीत आणणे, गरीब विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, गणवेश मिळवून देणे, शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्रत आयुष्यभर जोपासले. सलग २८ वर्षे विज्ञान प्रदर्शनात सहभाग आणि अनेक वेळा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर बक्षिसे मिळवली. अखंडित २१ वर्षे रक्तदान करून त्याच्या जागृतीसाठी शिबिरे घेतली. विविध माध्यमांचा वापर करून इतरांकडून रक्तदान करून घेतले.

गावोगावी ग्रामस्वच्छता अभियाणाची विविध कामे केली. साक्षरता अभियानात निफाड मधील ४० गावांमध्ये रात्रीच्या वर्गभेटी व पथनाट्यांद्वारे जनजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमेत सातत्याने सहभाग घेऊन विविध कार्यक्रम आणि स्वतः व्याख्याने देऊन समाजात जागृती केली. विद्यार्थ्यांसाठी २५० हस्तपुस्तिकेची स्व निर्मिती निर्मिती करून समृद्ध वाचनालय उभे केले. त्यांचे लेखन कौशल्य मोठे प्रभावी असल्यामुळे आतापर्यंत त्यांच्या स्वतःची ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यातील “उठा तुम्हीही जिंकणारच..!” हे पुस्तक महाराष्ट्रभर गाजले आणि सातासमुद्रापार पोहोचले. कोरोनात सलग नॉनस्टॉप १ हजार लेख लिहून नवा उच्चांक केला. अडीच महिन्यात पुस्तकाच्या २ हजार प्रती महाराष्ट्रभर गेल्या अन दुसरी आवृत्ती काढावी लागली. माजी जि. प. माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अध्यक्ष चषक स्पर्धा १९९७ मध्ये सुरू करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. ह्या स्पर्धेत विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थी सातत्याने एकही वर्ष न थांबता जिल्ह्यात नावलौकिकाला पात्र ठरवत शेकडो बक्षिसे जिंकली. सर्व शाळांमधले विद्यार्थी खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय पातळीवर पोहचवले. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांचे विद्यार्थी कीर्तनकार, नाटककार, सैनिक सेवा, नेतृत्व, संपादक, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. शैक्षणिक साहित्य निर्मिती, शिष्यवृत्ती कार्यशाळा, टेलिकॉन्फरन्स, गीतमंच, बालभवन, बाहुली नाट्य, भारतीयम, स्काऊट गाईड, योगासने वर्ग, स्वाध्याय संध्या अशा विविध प्रशिक्षणामध्ये राज्य पातळीपर्यंत तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी भूमिका बजावली. सतत ३६ वर्षे हा अवलिया न थांबता न चुकता फक्त आणि फक्त शिक्षकी पेशाला योग्य न्याय देण्यासाठी झगडत राहिला. या सर्व कार्याची दखल नाशिक जिल्हा परिषदेने घेऊन २००४ ला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. पुढे जाऊन त्यांच्या कार्याची ख्याती राज्यभर पसरली. २०११ च्या शिक्षकदिनी त्यांना देशाच्या तत्कालीन पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर आणि शेकडो पुरस्कार मिळवूनही ते ३१ ऑगस्ट २०२५ ला प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून सेवानिवृत होईपर्यंत धडाकेबाज कामगिरी करत राहिले. त्यांच्या सामाजिक कार्याचे योगदान खूप मोठे आहे. कुमावत समाज राज्य सचिव, कुमावत वेब पोर्टल संपादक, भटक्या विमुक्त जमाती संघटन, मराठी साहित्य परिषद संघटक, प्राथमिक शिक्षक समिती राज्य पदाधिकारी आणि बारा बलुतेदार महासंघाचे प्रमुख राज्य प्रवक्ते अशा विविध पदावर ते यशस्वीपणे कार्यरत आहेत. गेल्या ३६ वर्षात कधीही दीर्घ रजा न घेतलेला हा माणूस आजही त्याच ताकदीने काम करत आहे. त्यांच्या कार्याचा सर्व शिक्षक वर्गाला आणि समाज बांधवांना सार्थ अभिमान वाटतो.

error: Content is protected !!