इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ४७ व्या राज्यस्तरीय कुमार-कुमारी खो खो स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक देऊन नाशिकच्या मुलींच्या संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले आहे. नाशिक विरूद्ध उस्मानाबाद या दोन संघात मुलींचा अंतिम सामना मध्यांतराला ७ विरुध्द ७ अशा समान गुण संख्येवर होता. नाशिकने आपल्या पहिल्या आक्रमणात उस्मानाबाद संघाचे सात गडी बाद केले. नाशिकच्या वृषाली भोयेने धारधार आक्रमण करत ४ गडी बाद केले. तिला कौसल्या पवार १ गडी, ऋतुजा सहारे, मनिषा पडेर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. नाशिक संघाकडून संरक्षण करतांना छोट्या चनीच्या सरीता दिवाने २.५० सेकंद, कौसल्या पवार व ऋतुजा सहारे यांनी प्रत्येकी १.४५ तर निशा वैजल नाबाद १.२० मिनिट संरक्षण केले.
सामन्याच्या शेवटच्या डावात चार मिनिट आक्रमण झाल्यानंतर नाशिकची कर्णधार कौसल्या पवार ही खुंटावर धडकल्याने जायबंदी झाली. त्यामुळे नाशिकच्या मुलींचे लक्ष विचलित झाल्याने त्याने उस्मानाबादचे चार गडी बाद केले. त्यामुळे उस्मानाबाद संघाला पाच गडी बाद करायचे होते ते त्यांनी ६ मिनीटात बाद केले. उस्मानाबाद संघाने हा अंतिम सामना १२ विरूद्ध ११असा १ गुण व तीन मिनिट राखून जिंकला. नाशिकची वृषाली भोये ही स्पर्धेतील सर्वोकृष्ट आक्रमक ठरली. तिला ५००० रुपये चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
नाशिक जिल्ह्याच्या राज्यस्तरीय उपविजेत्या मुलींच्या खो खो संघात नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील आठ मुलींचा समावेश आहे. राज्यस्तरीय उपविजेत्या नाशिक जिल्हा मुलींच्या खो खो संघाचे व त्या संघाचे कोच मंदार देशमुख व महिला कोच गीता देशमुख यांचे विशेष अभिनंदन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनी केले आहे.