इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आज १ लाखाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे रुग्णालय आणि दोन ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडला. कोरोना रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इगतपुरी, घोटी ग्रामीण रुग्णालय, रेल्वे रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे, काननवाडी, बेलगाव कुऱ्हे, काळूस्ते, धामणगाव, धारगाव, खेड, नांदगाव सदो यांची भूमिका मोलाची ठरली आहे.
इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी १ लाखाच्या कोरोना लसीकरणाचे सर्व श्रेय वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना दिले आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले आहे. आगामी काळात झपाटून काम करून इगतपुरी तालुक्यात अधिकधिक लसीकरण पूर्ण करू असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान इगतपुरी तालुक्यात आज दिवस अखेर फक्त ३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या महिनाभर पासून तीन आकड्यावर स्थिर आहे. यामुळे तालुकावासियांमध्ये सध्या कोविड मुक्तिचा आनंद पसरला असला तरीही गाफील राहू नये, योग्य ती काळजी घ्यावी, कोरोना नियमावलीचे कटाक्षाने पालन करावे, मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.
आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या कौशल्यदायी नियोजनामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १ लाखांचा टप्पा सर्वांना पूर्ण करता आला. आमच्यासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला वेळोवेळी लसीकरणासाठी तालुका कार्यालयाने आवश्यक ते संपूर्ण सहकार्य केले. डॉ. एम. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापुढेही लसीकरणाच्या उच्चांकाकडे वाटचाल करू ह्यात शंका नाही.
- डॉ. विजय माळी, वैद्यकीय अधिकारी, वाडीवऱ्हे