
इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी पारदेवी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अशोक जेठू पिंगळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी ही नियुक्ती केली. इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष अशोक जेठू पिंगळे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अशोक पिंगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी त्रिंगलवाडीचे पोलीस पाटील सुरेश कोकणे, जेष्ठ नेते मल्हारी गटकळ, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र भले, बलायदुरीचे ग्रामपंचायत सदस्य हिरामण दुभाषे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अशोक पिंगळे हे सर्वोत्तम कार्य करतील. त्यांच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सुटायला मोठा हातभार लागेल असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी यावेळी व्यक्त केला.
