इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
“टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकी पॅटर्न”मुळे आदिवासी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सुखकर झाले आहे. कोरोना काळात शाळा बंद असतानाही टीव्हीवरच्या शाळेमुळे विद्यार्थी अखंडित शिक्षणाचा लाभ घेऊ शकले. मागे वळून पाहताना इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी शाळा आणि विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधली आहे असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते अनिल ( चंद्रभान ) सुखदेव जाधव यांनी काढले. एक वर्षांपूर्वी राज्यभर गाजलेला टीव्हीवरच्या शाळेचा प्रोजेक्ट अचानक पाहण्याचे ठरवले होते. आज रविवार असल्याने सहजच हा प्रोजेक्ट पाहायला मिळेल की नाही ही शंका होती. तरीही हा बहुमोल प्रकल्प अनुभवता आला असे ते म्हणाले. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या ह्या शाळेला पाहून कृतार्थ झालो असेही ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते अनिल ( चंद्रभान ) सुखदेव जाधव यांच्याकडून टिव्हीवरच्या धामडकी शाळेच्या प्रकल्पाला २ टीव्ही संच समर्पित करण्यात आले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमावेळी ते ग्रामस्थांशी भरभरून बोलत होते. प्रमोद परदेशी यांच्यासारखे शिक्षक धामडकीवाडीच्या शिक्षणाचा चेहरामोहरा बदलू शकतात असेही ते म्हणाले. श्री. जाधव यांच्या मदतीने प्रकल्पासाठी २ टीव्ही संच देण्यात आले. आगामी काळात सुद्धा अधिकाधिक मदत देण्यात येऊन शिक्षणाला हातभार लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, सहकारी शिक्षक दत्तू निसरड, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगीवले, चांगुणा आगीवले, बबन आगीवले, गोपाळा आगीवले, सीताराम आगीवले आदी उपस्थित होते.
आमची वाडी अतिदुर्गम भाग असूनही वाडीच्या आनंददायी शिक्षणाचा रस्ता मात्र पक्का झाला आहे. आमच्या वाडीला पक्का रस्ता कधी होईल हे माहीत नाही पण शिक्षणाच्या पक्क्या रस्त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची झालेली प्रगती भूषणावह आहे.
- गोकुळ आगीवले, ग्रामपंचायत सदस्य भावली