

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावरील देवीच्या मंदिराच्या पाठीमागील दरीत एका ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा घातपात झाल्याची शक्यता येथील स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या १५ दिवसांपुर्वी एक ३५ वर्षीय महिला कळसुबाई शिखरावरील मंदिर परिसरात फिरत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली. चारपाच दिवस मंदिर परिसरात फिरत असलेली ही महिला दिसत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला असता मंदिराच्या पाठीमागील दरीत या महिलेचा छिन्न विच्छीन्न अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती राजुर पोलीसांना दिल्यानंतर राजुर पोलीस ठाण्याचे पोलीस दोन दिवसांनी घटनास्थळी आले. मात्र सदर हद्द घोटी पोलीस ठाण्यात येत असल्याने मृतदेहाला हात न लावताच पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वादामुळे निघुन गेले. शिखरावर पाऊस सुरु असल्याने पाण्यामुळे या महिलेचा मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. अखेर घोटी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती मिळताच घोटीचे पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, पोलीस हवालदार सुहास गोसावी, शिवाजी शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. या महिलेची ओळख पटली नसुन या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास घोटी पोलीस ठाण्यात सपर्क करावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांनी केले आहे.