एकुलत्या एक युवकाची घोटीत गळफास घेऊन आत्महत्या

वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

घोटी शहरातील स्टेशनरोड परिसरातील गौरव विलास वालझाडे वय २० या युवकाने शुक्रवारी साडे नऊ वाजता घराच्या पाठीमागील गोडावूनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गौरव हा विलास वालझाडे यांचा एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरातून साडे नऊ वाजता बाहेर जातो असे सांगून गौरव घरातून बाहेर पडला. रात्रीचे बारा एक वाजले तरी गौरव घरी परतला नाही म्हणून आईने अनेकदा फोन लावले. मात्र फोन उचलला जात नसल्याने घरच्यांच्या काळजीत भर पडली. मित्र नातेवाईक यांना माहिती देण्यात आली. मात्र तपास लागेना. अखेर घराच्या मागील बाजूला असलेल्या गोडावूनमध्ये पाहाणी दरम्यान गौरव हा गळफास घेऊन लटकला असल्याचे दिसताच घरच्यांनी हंबरडा फोडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घोटी पोलिसांना कळवत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या अगोदरच प्राणज्योत मालवली होती. गौरव हा एकुलता एक असल्याने सर्वांचा लाडका होता. हट्टी व तडक्या स्वभावाचा असल्याने सर्वच त्याचे लाड करत होते. याबाबत पोलिसांनी आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हवालदार धर्मराज पारधी, शरद कोठुळे हे करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!