श्रमजीवी संघटनेमुळे पारदेवी येथील कातकरी वस्तीचा पाणीप्रश्न कायमचा सुटला

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पारदेवी येथील कातकरी वस्तीचा पाण्याचा प्रश्न आज कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्याने पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेविका यांनी हा प्रश्न सोडवला. कातकरी कुटुंबांनी श्रमजीवी संघटनेचे आभार व्यक्त केले आहेत. आदिवासी कातकरी समाजासाठी सर्वांनी साहाय्य करून ह्या प्रकरणी सकारात्मक तोडगा काढल्याने पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पारदेवी येथील कातकरी वस्तीतील विहिरीत एका हॉटेलचे अशुद्ध पाणी येत असल्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. ह्याबाबत संबंधित कातकरी कुटुंबांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा म्हणून श्रमजीवी संघटनेने ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र ह्यामध्ये गतिमानता येत नसल्याने संघटना आक्रमक झाली होती. त्यानुसार गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्तार अधिकारी संजय पवार आदींनी कातकरी वस्तीमध्ये भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ह्या वाडीला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन केले. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित हॉटेलचे प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चेत ठरल्याप्रमाणे कातकरी वस्तीला शुद्ध पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. आता ह्या वस्तीमध्ये सर्व कुटुंबांना शुद्ध पाणी मिळणार आहे. हा प्रश्न निकाली निघाल्याने श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, तालुकाध्यक्ष सीताराम गावंडा, तालुका सचिव सुनिल वाघ यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींचे आभार मानले आहेत.

पारदेवी येथील कातकरी वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले. कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेले प्रभावी नियोजनामुळे प्रश्न सुटला. आम्ही संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.
- भगवान मधे, सरचिटणीस श्रमजीवी संघटना