इगतपुरीनामा न्यूज दि. १८ :
इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या चिंचलेखैरे या आदिवासीबहुल गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेची स्थापना १९५६ च्या स्वातंत्र्यदिनी झाली असल्याने सतंत्र्यादिनाच्या सोबतच शाळेचा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मंगेश मिल्खे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच मंगाजी खडके, उपसरपंच भाऊ भुरबुडे, सुरेश भुरबुडे यांनी केले. यावेळी शाळेची विद्यार्थिनी अनिता भले हीचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक पुष्कर महाबळ आणि त्यांच्या टीमने जिल्हा परिषद शाळेला एलईडी स्मार्ट टिव्ही भेट दिला, तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी खेळणी आणि खाऊचे वाटप केले.
गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांच्यासह केंद्रप्रमुख तथा चिंचले खैरे शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, भाग्यश्री जोशी, नामदेव धादवड, प्रशांत बांबळे, हौशिराम भगत, योगेश गवारी आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
बूँदा-बांदी या व्हिडिओ गाण्याचा डिजिटल प्रीमियर : लॉकडाऊन काळात ग्रामीण भागातील शाळा आणि शिक्षणाची झालेली परवड, शिक्षकांची विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठीची धडपड या सर्व परिस्थितीवर आधारित असलेले “बूँदा – बांदी” ह्या हृदयस्पर्शी गाण्याचे चित्रीकरण चिंचलेखैरे परिसरात करण्यात आलेले आहे. दिग्दर्शक पुष्कर महाबळ, सई भोपे, अंकिता नारंग यांनी या गाण्याचे चित्रीकरण केले असून यात चिंचलेखैरे ग्रामस्थांसह शिक्षक आणि विद्यार्थी यांचाही सहभाग आहे. या छोटेखानी आणि अनौपचारिक चित्रीकरणाचा अनुभव खूप छान होता असे दिग्दर्शक महाबळ यांनी आवर्जून सांगितले. या गाण्याचे लेखन मनोज यादव यांनी तर गाण्याची निर्मिती आणि संगीत मेघदीप बोस यांची असून शेखर रावजियानी यांनी गायले आहे. दिग्दर्शन पुष्कर महाबळ यांनी तर सिनेमॅटोग्राफर म्हणून सई भोपे आणि अंकिता नारंग यांनी काम पाहिले आहे. चींचलेखैरे परिसरात उत्तम चित्रीकरणाला भरपूर वाव असून आगामी प्रोजेक्ट साठी नक्कीच याचा विचार करू असेही दिग्दर्शक पुष्कर महाबळ यांनी यावेळी सांगितले.