‘तो’ खड्डा ठरतोय जीवघेणा ; अपघातांना मिळतेय आमंत्रण

सुनिल बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावर बुवाची वाडी बस थांब्याजवळ रस्त्यात मोठा खड्डा पडला आहे. ह्या खड्ड्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाली आहे. ह्या खड्ड्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकृष्ठ दर्जाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. मागील वर्षीच या रस्त्याची डागडुजी करून नावालाच मलमपट्टी करण्यात आली होती. हा रस्त्या नाशिक ते जव्हार, पुढे पालघरला जाऊन मिळत असतो. पुढे चारोटी नाका गुजरात हायवेला जोडला आहे. यामुळे रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु याच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डडे पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक वेळा अपघातही होत असतात.

त्र्यंबकेश्वर पासून सात किलोमीटर अंतरावर असलेली बुवाची वाडी आंबोली जवळ रस्त्याला मोठा खड्डा पडला असून दररोज दुचाकीस्वाराचा अपघात होत आहे. दिवसा हा खड्डा डोळ्यांना दिसतो पण रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार या खड्ड्यात जोरात आपटून दररोज जखमी होत आहे. जव्हारकडून त्र्यंबकेश्वर तसेच नाशिककडे जाताना बुवाच्या वाडी जवळ मोठा उतार असल्याने वाहने एकदम जोरात येत असतात. अचानक समोर भला मोठा खड्डा आल्याने दुचाकी तसेच चारचाकीचे ही मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण असून लवकरात लवकर हा खड्डा भरला जावा अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासह संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी संतप्त मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!