..अन्यथा इगतपुरी तालुक्यातील एकही इंच जमीन प्रकल्पांना देणार नाही : आमदार हिरामण खोसकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

इगतपुरी तालुक्यातील शेतकरी बांधवाना विश्वासात घेतल्याशिवाय आणि संमती असल्याशिवाय तालुक्यातून जाणाऱ्या ट्रेन प्रकल्पाला जमीन मिळेल. शेतकऱ्यांना मान्य असेल तरच  शेतकरी जमीन देण्यात सहकार्य करतील. अन्यथा एकही इंच जमीन दिली जाणार नाही. यासाठी शेतकरी बांधवांच्या सोबत असून शेतकरी बांधवांनी एकोप्याने निर्णय घ्यावा असे प्रतिपादन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील समृद्धी बाधित शेतकरी, व बुलेट ट्रेन साठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

घोटी येथे राजाराम साळवी सभागृहात आयोजित शेतकरी बैठकीवेळी माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, केरुदादा खतेले, माजी सभापती गोपाळ लहांगे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण गायकर, दौलत दुभाषे, भास्कर गुंजाळ, रमेश जाधव, राजू भटाटे, ज्ञानेश्वर कडू, वसंत भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, शेतकरी बांधवांनी आपल्या समस्या, मनोगत व्यक्त केले.

तालुक्यातील एकूण शेतजमिनीतुन 75 टक्के जमीनी शासनाच्या विविध प्रकल्पासाठी संपादित झालेली आहे. यात महामार्ग, रेल्वे, उद्योग, धरणे, तलाव, वन, संरक्षण विभाग, शासकीय इमारती, समृद्धी मार्ग ह्या प्रकल्पांना जमीन गेली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. धरणे आणि समृद्धी मार्गात दडपशाही, फसवणूक करून जमिनी घेतल्या. अजूनही काही शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही. अनेक गैरप्रकार आणि दिशाभूलीचे करून व्यवहार करून जमिनी संपादित केली। समृद्धी मार्ग करताना आजही अनेक लगतच्या,बाधित शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. वहिवाट रस्ते, शिवार रस्ते बंद केले, पाईपलाईन, जमीन सपाटीकरण न करणे, पाण्याचे मार्ग बदलून शेतीचे नुकसान करणे, सरकारी रस्ते पूर्ण खराब केले आहे. लगतच्या खाजगी इमारतीचे नुकसान करणे, स्थानिक लोकांना रोजगार न देणे, कामे न देणे अशा अनेक तक्रारी शेतकरी बांधवांनी यावेळी केल्या. 

लोकप्रतिनिधी आणि शासनाने याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा आमदारांना सोबत घेऊन महामार्ग काम बंद करू. होऊ घातलेल्या बुलेट ट्रेन मार्गासाठीही जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे शेतकरी उध्वस्त होईल. तालुक्यातील आदिवासी बांधव भूमिहीन होईल. शासनाने शेतकरी बांधवांच्या संमतीशिवाय एकही इंच जमीन घेऊ नये. शासनाने शेतकरी वर्गावर दडपशाही करू नये. अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी शिवराम झोले,जनार्धन माळी,गोपाळ लहांगे, पांडुरंग वारुंगसे, भास्कर गुंजाळ, रवी चव्हाण, अरुण गायकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकरी बांधवांच्या समस्या, अडचणी आणि समृद्धी मार्गाच्या तक्रारी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यासह बुलेट ट्रेनबाबत तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी यांना घेऊन महसूलमंत्री, पालकमंत्री, बांधकाम मंत्री यांची भेट घेणार आहे. बैठकीत तालुक्यातील विविध गावचे पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!