बेलगाव कुऱ्हे येथे चार गायींची पहाटे कत्तल ; एक गाय बेशुद्धावस्थेत : महिनाभरातील तिसऱ्या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संताप

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

इगतपुरी तालुक्यातील  बेलगाव कुऱ्हे येथे पशुपालकाच्या गोठ्यात बांधलेल्या ५ गाईंना अज्ञात चोरट्यानी सोडून नेत
त्यांची कत्तल करण्यात आल्याची संतापदायक घटना आज पहाटे पाच वाजता घडली. दुग्धव्यावसायिक संदीप गेणु गुळवे असे पशुपालकाचे नाव असून वाडीवऱ्हे पोलिसांनी पंचनामा करीत पुढील कारवाई सुरु केली आहे. गुळवे यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात सर्व गायी नेहमी प्रमाणे बांधल्या होत्या. पहाटे गायींना चारा टाकण्यासाठी ते उठले असतांना त्यांना गायींचे मांस डोक्याची शिंगे व पायांचे अवशेष इतरत्र पडलेले व उग्रवास येत होता. हे सर्व पाहून त्यांना भोवळ आली. त्यांना पाहून चोरट्यांनी कोयता, भूल दिलेल्या इंजेक्शनचे रिकामे सिरिन्ज एका गायीचे प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केलेले मांस व भूल दिलेली जीवंत गाय तशाच अवस्थेत टाकून पळ काढला. तेवढ्यात स्वतःला कसेबसे सांभाळत त्यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोक गोळा झाले. जमिनीवर पडलेला रक्ताचा सडा, छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेले गायींच्या शरीराचे अवशेष त्याच बरोबर गाभण गायींच्या पोटातील चार-सहा महिन्याची रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वासरांचे दोन अभ्रके सर्व पाहून जीवाचा थरकाप होणारी व तितकाच संतापदायक प्रकार पाहून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलिसांना माहिती कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर गायींचे अवशेष व मांस जमिनीत मातीआड केले असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान महिनाभरात तिसऱ्यांदा गायीची कत्तल झाल्याची घटना घडल्याने ह्या परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेस नेते संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली कैलास कर्पे, शाखाप्रमुख अंबादास धोंगडे, शिवाजी बाबुराव गुळवे, दत्तात्रय गुळवे, श्रीपत गुळवे, राजाराम दादा धोंगडे, कोंडाजी गुळवे, शिवाजी धोंगडे, संतोष सुखदेव गुळवे, संतोष विष्णू गुळवे, दत्तू गुळवे, काशिनाथ गुळवे, शंकर गुळवे आदी नागरिकांनी वाडीवऱ्हे पोलिसांत धाव घेऊन अज्ञात समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी ह्या प्रकरणी तपास करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत शिष्टमंडळाला सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!