
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
शेतीचा शोध महिलांनी लावला आहे ही गोष्ट अभिमानाची आहे. महाराष्ट्र शासन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेत उताऱ्यावर महिलांचे नाव लावणार असून हा मोठा क्रांतिकारी निर्णय असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ना. दादा भुसे यांनी केले. राज्यभरात जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहावा, संघटन वाढीतील अडचणी सोडवता याव्यात यासाठी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्यकारिणीची बैठक मालेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी समारोपीय सत्रात ना. दादा भुसे बोलत होते.
पुढे ते म्हणाले की राज्यभर दंगलसदृश्य वातावरण असतांना जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मालेगाव सारख्या संवेदनशील शहरात बैठकीसाठी उपस्थित आहेत. यावरून समाजाप्रती काम करण्याची तळमळ लक्षात येत असल्याचे सांगत कौतुक केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. बैठकीची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली. यावेळी प्रदेश संघटक आक्काताई माने व प्रदेश सदस्य प्रिया नागणे यांनी शिवरायांचा पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे, राज्य उपाध्यक्ष सुलभा कुंवर, ज्योती कोथळकर, विद्या गडाख, कोषाध्यक्ष इंदू देशमुख, प्रदेश संघटक आक्काताई माने, प्रदेश सदस्य वंदना आखरे, प्रिया नागणे, शकुंतला अहिरराव,सुरेखा राऊत यासह विभागीय अध्यक्ष वैशाली डुंबरे, मालेगाव जिल्हाध्यक्ष इंजि. शिल्पा देशमुख, नाशिक जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे, नाशिक महानगरप्रमुख चारुशिला देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष कल्याणी वाघ, जिल्हा उपाध्यक्ष संगीता पाटील, जिल्हा संघटक कल्पना निंबाळते, वनिता कोरटकर उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेडची वाटचाल व बैठकीचा उद्देश सांगितला. यावेळी सर्व राज्य पदाधिकाऱ्यांनी वर्षभरातील कामाचा आढावा दिला. जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी आगामी काळात संघटनेच्या वाढीसाठी जिल्हा दौरे, आगामी सामाजिक उपक्रम, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, अधिवेशन, विविध आंदोलन यावर दिवसभर मार्गदर्शन केले. प्रदेश उपाध्यक्ष विद्या गडाख यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष इंजि. शिल्पा देशमुख यांनी सुवर्णपंख ॲप संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून जिजाऊ ब्रिगेडने सुवर्णपंख ॲप बाजारात आणले असून या ॲपमुळे उद्योग क्षेत्रात महिलांना मोठी संधी मिळणार असल्याचे सांगितले. समारोपीय सत्रात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या रामदासी बैठकांना पर्याय म्हणून जिजाऊ ब्रिगेडने जिजाऊ तसेच तुकोबागाथा पारायण याचे घरोघरी वाचन सुरू करावे. महिलांमधील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा निर्मूलन यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. आभार वंदना आखरे यांनी मानले.

सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कोणत्याही शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित करू नये, सरसकट विजबिल आणि कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा असा ठराव करत निवेदन देण्यात आले.यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी वीज पुरवठ्यासाठी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी पैसे भरावेत.विजबिल कपातीसाठी मी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात “आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही” असा उल्लेख केल्याने जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. पुरोगामी वारसा पुढे चालवत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.