इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा दिवस उलटूनही पोर्टल अद्याप सुरूच झाले नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.
राज्यामध्ये जवळपास 50 हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी तीस हजार जागा भरण्यासाठी 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टल सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र ही घोषणा अजूनही कागदावरच असल्याचे चित्र आहे.
शिक्षकांचे रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची पद्धत 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता चाचणी त्याचबरोबर अभियोग्यता चाचणी अशा वेगवेगळ्या परीक्षा देऊन उमेदवार भरतीच्या आशेवर बसले आहेत. मात्र अद्यापही भरती प्रक्रिया सुरू न झाल्याने शिक्षण मंत्र्यांची घोषणा खरोखर भरतीसाठी होती की आणखी कशासाठी असा प्रश्न आता उमेदवारांना पडला आहे.
राज्यामध्ये 2010 पासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. ती कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच 2017 मध्ये पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आणि त्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. मात्र तब्बल सहा वर्षे उलटूनही अद्याप भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. पात्र उमेदवार यामुळे अस्वस्थ असून लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.