रुग्णवाहिका चालकाचे दातृत्व : मिंदे दाम्पत्याने वाढदिवसाच्या दिवशी दोन कुपोषित बालकांना घेतले दत्तक

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक दीपक पोपट  मिंदे यांनी वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला फाटा दिला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र प्रभागातील कार्तिक सोमनाथ दिवे वय २ वर्ष रा.सापगाव), ओंकार नवनाथ पारधी वय ३ वर्षे रा. काचुर्ली या दोन कुपोषित बालकांना दत्तक घेतले. त्यांचा वर्षभराचा सर्व खर्च उचलून त्या कुपोषित बालकांना सुदृढ करण्यात येईल. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दीपक मिंदे व त्यांच्या पत्नी आशा गटप्रवर्तक सविता मिंदे हे दाम्पत्य प्रयत्न करणार आहेत.

दीपक मिंदे यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या भागात रुग्णसेवेचे अति महत्त्वाची सेवा बजावली आहे. कित्येक ठिकाणी गाडी नसताना स्वतः गर्भवती महिलेला डोली करून दवाखान्यात नेण्याचे काम देखील दिपक मिंदे यांनी पार पाडले आहे. रात्री-अपरात्री रुग्ण असो किंवा अडलेली बाई असो,  सर्वांच्या मदतीसाठी कधीही मिंदे यांनी मागेपुढे पाहत नाही. कर्तव्य बजावत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आदिवासी बहुल भाग असल्याकारणाने अनेक ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. रुग्णांची उपचारासाठी धावपळ होत असते. परंतु मिंदे हे अडचणीतुन मार्ग काढून त्या रुग्णाला दवाखान्यात पोचऊन त्यांचे जीव वाचवण्याचे कार्य करत आहेत. 

सध्याच्या काळात वाढदिवसाच्या निमित्ताने  अनाठायी मोठा खर्च करणारे लोकं आहेत परंतु दीपक मिंदे  व त्यांच्या पत्नी सविता मिंदे यांनी या सर्वाला फाटा देत तालुक्यात एक नवा आदर्श घडवला आहे. त्यामुळे त्यांचे तालुकाभरातून  कौतुक होत आहे. त्र्यंबकेश्वरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, आंबोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता भोई, डॉ. बंडू घोरसडे, डॉ. चत्तर आणि आरोग्य विभागाच्या इतर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

कुपोषणावर शासन पावले उचलत असताना आपणही या समाजाचे देणे लागतो. रुग्णवाहक असल्याने हे सर्व जवळून पाहत होतो. त्यामुळे वाढदिवस साध्या पध्दतीने करून आपण गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे गरजचे आहे. दोन बालकांना दत्तक घेऊन त्यांचे चांगले संगोपन करणार आहे.  त्यांना सुदृढ करण्यावर भर दिला जाईल. या कामात मला पत्नीची मोलाची साथ आहे.
दीपक मिंदे, रुग्णवाहिका चालक, अंबोली