इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. अशावेळी बेरोजगार युवक शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त होत आहे. मात्र पुरेशा भांडवलाअभावी हे युवक दूध डेअरी, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, शेळ्या मेंढ्यापालन, पोल्ट्री फार्म अशा व्यवसायासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र युवकांना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. म्हणून शासनस्तरावर प्रयत्न करून युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे निवेदन राज्याचे दुग्धव्यविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांना देण्यात आले
नाशिक दौऱ्यावर ना. केदार आले असता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मंत्रीमहोदयानी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जेष्ठ नेते देवराम नाठे, रघुनाथ खातळे, मधुकर गायकर, युवक काँग्रेसचे इगतपुरी शहराध्यक्ष गणेश कौटे, किरण पागेरे, अरुण भोर, राजाराम रोकडे आदी उपस्थित होते.
इगतपुरी धरणांचा तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. तालुक्यातील ७२ टक्के जमीन विविध प्रकल्पांसाठी शासनाने संपादित केल्याने तालुक्यात असंख्य युवक बेरोजगार झाले. अशा वेळी युवकांसाठी अनेक योजना आहेत. मात्र त्यांना छोटे मोठे रोजगार करण्यासाठी भांडवल लागते. अशा वेळेस बँका मात्र तरुणांना मिळकत तारण देऊनही कर्ज देत नाही. म्हणून मंत्री महोदयांची भेट घेत कैफियत मांडली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
- भास्कर गुंजाळ, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस