१५ ऑगस्टला नाशिकमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ), कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – दैनंदिन आहारात अधिकाधिक रानभाज्यांचा समावेश व्हावा, लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) नाशिक, कृषी विज्ञान केंद्र नाशिक आणि रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टला उदोजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय, केबीटी इंजिनियरिंग कॉलेज जवळ डीके नगर गंगापूररोड नाशिक येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. ह्या महोत्सवाचे उदघाटन नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे हे करणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाज्या खरेदी कराव्यात. आरोग्यवर्धक रानभाज्यांचा समावेश आपल्या आहारात करावा असे आवाहन  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले आहे. मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. यामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो.

जंगलात, शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याने या खाद्य संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्यविषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी विक्री व्यवस्था करून आदिवासी शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ह्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यपर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढविणे गरजेचे असल्याचे  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) नाशिकचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी सांगितले. रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगला बाजार मिळेल शहरी ग्राहकांना माहिती नसणाऱ्या भाज्यांची ओळख होईल. औषधी व पौष्टीक गुणधर्मानी परिपूर्ण असणाऱ्या रानभाज्यांमध्ये विशेषतः पावसाळ्यात करवंदे, गुळवेल, कडूकंद, चाईचा मोहर, आणि सुरण यांचा समावेश होतो. हिरव्या भाज्यांमध्ये तांदुळजा, काठेमाथ, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डु, घोळ, अळू, खुरसनी, तोडली आणि लोथ याचा समावेश होतो. ह्या महोत्सवास नरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!