
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावरील के. के. वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल या दरम्यानच्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. उद्या रविवारी दि. ८ ला सकाळी हा उड्डाण शहरवासिय तसेच वाहन धारकांच्या प्रवासासाठी खुला होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमांतर्गत हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. विना अडथळा तसेच या दरम्यानच्या महामार्गावर सतत होणारे अपघात टळावेत यासाठी सदर उड्डाणूपल बांधण्यात आला असून सुखकर प्रवासासाठी वाहनधारकांनी या उड्डाणपूलाचा वापर करावा असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे.
के. के. वाघ कॉलेज, औरंगाबाद नाका, अमृतधाम, बळीमंदिर, हॉटेल जत्रा, आडगाव मेडिकल कॉलेज या परिसरातील महामार्गावर विद्यार्थी आणि शेतकरी तसेच शहरवासियांची मोठी वर्दळ असते. या महामार्गावर शेतीमालाने भरलेल्या ट्रकच्या सतत रांगा असतात. महामार्गालगत अनेक शाळा, कॉलेज असल्याने या महामार्गावर अनेक विद्यार्थ्याचा अपघातात हकनाक बळी गेलेला आहे. याची दखल घेत गोडसे यांनी खासदार झाल्यावर लगेचच महामार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव सुरू केला. पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने चार वर्षापूर्वी उड्डाणपूलाच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली. केंद्र शासनाने या उड्डाणपूलासाठी सुमारे ४५० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके, टेक्नीकल विभागाचे मॅनेजर दिलीप पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर धनंजय जाधव, टीपीएफ इंजिनिअरिंगचे पंकज मोहवे यांच्या मार्गदर्शनाखाली आजमितीस या उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला करावा या शहरवासिय आणि वाहनधारकांच्या आग्रही मागणीतून उद्या रविवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सदर उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे.
