पुलाचा कथडा तोडून पिकअप घुसली थेट रेल्वे रूळांवर ; महामार्गावरील बोरटेंभे जवळ झाली घटना

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील बोरटेंभे येथे रेल्वे पुलावरून एक पिकअप पुलाचा कथडा तोडून थेट रेल्वे रूळांवर घुसली. या विचित्र अपघातात २ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने भुसावळ इगतपुरी मेमो गाडी येत असल्याने येथे हजर असलेल्या रेल्वे कर्मचारी यांनी या रेल्वे गाडीला लाल झेंडा दाखवत मेमोच्या दिशेने पळत सुटले. यावेळी मेमो चालकाने रेल्वे थांबवल्यामुळे मोठी जिवितहानी टळली.
अधिक माहिती अशी की, मालुंजे ता. इगतपुरी येथील पिकअप क्र. MH15 GV4694 ही गाडी बोरटेंभे परीसरात आज मुंबईहून आली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही पिकअप महामार्गावरील रेल्वे पुलाचे संरक्षक कथडे तोडून थेट ३५ फुट खोल असलेल्या रेल्वे रूळांवर येऊन आदळली. कामावरील हजर रेल्वे कर्मचारी यांनी प्रसंगवधान राखत भुसावळहुन इगतपुरीकडे येणाऱ्या रेल्वे मेमो एक्सप्रेसला लाल झेंडा दाखवुन थांबविल्यामुळे मोठी जिवितहानी टळली. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलीस, इगतपुरी पोलीस यांनी धाव घेऊन रेल्वे ट्रॅक वरील पिकअप बाजुला केली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना जगतगुरु नरेंद्राचार्य मोफत रुग्णवाहिकेतुन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रेल्वे कर्मचारी यांनी भुसावळ कडून येणारी रेल्वे एक्सप्रेस थांबवली नसती तर मोठी जिवीतहानी झाली असती अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!