मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135
‘मनगटावरची शान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घड्याळाला पेहरावात आजही विशेष महत्त्व आहे. घड्याळाचा ब्रान्ड कोणता ? त्याची किंमत किती ? यावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. आजही पुरुषांसाठी ‘घड्याळ’ हा एकमेव दागिना असल्याने त्याचे महत्त्व लक्षात येते. जगातील सर्वांत चांगल्या ब्रान्डचे घड्याळ आपल्या मनगटावर असावे असे अनेक युवकांना वाटते.
आज मोबाईलमध्येही वेळ समजत असल्याने घड्याळे लयास जातील असे तर्क-वितर्क अनेकांकडून केले जात आहे. तरी आजही घड्याळाची एक वेगळीच क्रेझ युवकांमध्ये दिसून येते. आज आपण घड्याळ दुरुस्ती या व्यवसायाबाबत अधिक माहिती घेऊ.
चावीचे घड्याळ, ऑटोमटीक घड्याळ व सेलचे घड्याळ असे घड्याळाचे तीन प्रकार आहेत. दुसरा प्रकार म्हणजे भिंतीवरील घड्याळे. कोणतीही वस्तू अथवा यंत्रांना वर्षा-दोन वर्षानंतर दुरुस्तीची गरज पडतेच. पूर्वी घड्याळ दुरुस्तीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम आयटीआयमध्ये उपलब्ध होता, पण आज तोही बंद करण्यात आला आहे. दुसऱ्याच्या दुकानात घड्याळ दुरुस्तीचे काम शिकून हे दुरुस्तीचे ज्ञान आजही एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे. घड्याळ दुरुस्ती या व्यवसायात घड्याळाची अनेक प्रकारची दुरुस्ती करता येते. त्यात चावीची लेव्हल, ज्वेल दुरुस्ती, घड्याळातील सेल बदलणे, सर्किट कॉईल दुरुस्ती, सर्विसिंग, बॅलन्स दुरुस्ती, मशीन बदलणे, काच बदलणे, चावी बदलणे आदी दुरुस्तींचा प्रामुख्याने समावेश होतो. भारतात टायटन, टायमेक्स, सोनाटा, सिटीझन, रोडेक्स, टी सॉर्ट, फास्ट ट्रेक आदी देशी तसेच विदेशी कंपनींचे घड्याळे उपलब्ध आहेत.
देशी घड्याळे १ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत तसेच विदेशी ५ हजार ते १५ लाख रुपये किंमतीत उपलब्ध आहेत. जगातील सर्वांत महागडे घड्याळ चोपार्ड या कंपनीचे असून त्याची किंमत १ अब्ज ६५ कोटी रुपये आहे. फॅन्सी लुक असणारे चायना मेड घड्याळे तसेच स्टील, सोनेरी, कॉपर, डायमंड या प्रकारातील आकर्षक घड्याळे आज बाजारात उपलब्ध आहेत. मोबाईलमुळे घड्याळ विक्रीवर काहीच परिणाम झालेला नाही.
युवक, घड्याळ दुरुस्तीचे कौशल्य प्राप्त केल्यानंतर भाडेतत्त्वावर दुकान घेऊन केवळ १० ते २० हजारात हा व्यवसाय सुरु करू शकतो. घड्याळ दुरुस्तीसाठी प्रामुख्याने छोटे स्क्रू-ड्रायव्हर, चिमटे, मल्टी मीटर, सेल टेस्टर, ब्रश, पक्कड, कटर, स्टोन, पिन व्हाइस आणि काही कच्चा माल यांची आवश्यकता असते. घड्याळ दुरुस्ती बरोबरच सुमारे १ लाख रुपये भांडवलात नवीन घड्याळ विक्री देखील करू शकता. या सोबतच गॉगल, बेल्ट, पर्स आणि भिंतीवरील घड्याळांची देखील विक्री करता येते. या व्यवसायातून युवक १५ ते ५० हजार रुपये प्रती महिना कमाई करू शकतो.
बदलत्या काळानुसार स्मार्ट वॉच, फिटनेस बँड अन्य गॅझेटचा वापर वाढत आहे. स्मार्ट वॉच घड्याळाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे घड्याळ स्मार्ट फोनशी कनेक्ट करून याच्या सहाय्याने कॉल घेऊ शकतो किंवा रिजेक्ट करू शकतो. युवकांनी घड्याळ दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतल्यास विविध कंपन्यांच्या सर्विस सेंटरमध्येही नोकरी उपलब्ध आहे. यात १५ हजार ते ३० हजार प्रतिमाह पगार दिला जातो. मात्र हे सर्व अवलंबून आहे युवकाच्या अंगी असलेल्या कौशल्यावर आणि प्रामाणिकपणावर.