भुरळ पाडत पैसे लंपास करणारी टोळी इगतपुरी तालुक्यात सक्रीय ? : महामार्गावरच्या भागातील व्यापारी आणि छोटे दुकानदार होताहेत ‘टार्गेट’

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – महामार्गावर आणि बाजार पेठेत व्यापारी वर्गाला बोलण्यात गुंतवून भुरळ पाडत लुटणारी टोळी इगतपुरी, घोटी शहरात कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे. ही टोळी गोंदे, वाडीवऱ्हे या मोठ्या गावांमध्ये आणि महामार्गावरील व्यापाऱ्यांना लक्ष करत असल्याचेही नागरिक बोलत आहेत. या टोळीने शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच मुंबई आग्रा महामार्गावरील दुकाने, छोटे हॉटेल्स, टपऱ्या यांना विशेष लक्ष्य केले असल्याचे समजते. यामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसल्याची खात्रीपूर्वक माहिती “इगतपुरीनामा”च्या सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान लुटीच्या घटना घडल्या असल्या तरी पैसे लुटले गेलेच आहेत, आता किमान प्रतिष्ठा तरी जावू नये, या भीतीपोटी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याची खमंग चर्चा परिसरात दबक्या आवाजात होत आहे. मात्र हे रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती देणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घोटी शहरातील एका घटनेमध्ये एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला या चोरट्यांच्या टोळीने आम्ही सीबीआय अधिकारी असून अमली पदार्थ तस्करीची चौकशी सुरू आहे असे सांगत तपासणीच्या नावाने भुरळ पाडली. नंतर त्यांच्याजवळचा किमती ऐवज लुटून पोबारा केल्याची माहिती मिळाली आहे. दुसऱ्या एका घटनेत इगतपुरी भागातील दोन दुकानदाराकडे सुट्टे पैसे मागण्याचा बहाणा करून संबंधित दुकानदाराकडून जवळपास दहा बारा हजार रुपयांची रोख रक्कम आणि दुकानातील इतर काही वस्तू हातोहात लंपास करत सदर टोळी पसार झाल्याची घटना घडली आहे. 

घोटी शहर ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ आहे. सततची वर्दळ असल्याने शहर नेहमी गजबजलेले असते. इगतपुरी शहरात तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,तालुका पोलिस ठाणे, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, न्यायालय अशी विविध शासकीय कार्यालये असल्याने शहरात नेहमीच वर्दळ सुरू असते. उपरोक्त घटनेसारख्या अनेक घटना दोन्ही शहरांमध्ये घडल्या असून दोन्ही ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांना गंडा घातल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान या प्रकारांमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने यावर तातडीने उपाय योजना करून या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. कुठलाही अनोळखी व्यक्ती आपणास पोलीस असल्याचा अथवा अन्य प्रकारे बनाव करीत असेल तर त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. पोलिसांना सहकार्य करून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!